पॉस मशीनद्वारे शंभर टक्के धान्य वाटपाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:21 AM2017-10-30T01:21:46+5:302017-10-30T01:23:01+5:30
अकोला : धान्याचे वाटप करण्यासाठी शासनाने संगणकीकृत पॉस मशीन दिल्या आहेत. दिवाळीत त्यातून ७५ टक्के वाटप झाले. पुढील महिन्यात १00 टक्के धान्य वाटप पॉस मशीनद्वारेच केले जाईल, त्यातून धान्याचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : धान्याचे वाटप करण्यासाठी शासनाने संगणकीकृत पॉस मशीन दिल्या आहेत. दिवाळीत त्यातून ७५ टक्के वाटप झाले. पुढील महिन्यात १00 टक्के धान्य वाटप पॉस मशीनद्वारेच केले जाईल, त्यातून धान्याचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सुधारित धान्य वितरण पद्धतीनुसार अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची १ ऑक्टोबरपासून द्वारपोच वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये गोदाम ते स्वस्त धान्य दुकानापर्यंत थेट धान्याची वाहतूक सुरू आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात पुरवठा अधिकारी कार्यालयाने द्वारपोच योजनेचे नियोजन केले आहे. त्यामध्ये सर्व संबंधित अधिकारी-कर्मचार्यांना दिलेल्या निर्देशाप्रमाणे काम होत असल्याने जिल्ह्यात द्वारपोच योजना यशस्वी झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
चालू महिन्यात दिवाळीपूर्वी गहू आणि तांदूळ मिळून ८१,५00 क्विंटल धान्याची उचल भारतीय खाद्य निगमच्या गोदामातून करण्यात आली. वाहतूक कंत्राटदारामार्फत अकोला शहर आणि जिल्ह्यातील दुकानांमध्ये दिवाळीपूर्वीच शंभर टक्के पुरवठा करण्यात आला. सर्वांच्या समन्वयाने योजना जिल्ह्यात उत्कृष्टपणे राबवली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना वाटप केले जाणारे धान्य पॉस मशीनद्वारेच दिले जाणार आहे. त्यामुळे धान्याचा काळाबाजार करण्याची संधी पॉस मशीनच्या वापरातून मोडीत निघणार आहे.
दुकानदार किंवा यंत्रणेतील कोणीही तसा प्रयत्न केल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.
लाभार्थ्यांना शंभर टक्के धान्य मिळणार
द्वारपोच योजनेतून दुकानदारापर्यंत संपूर्ण धान्य पोहचवले जात आहे. त्यामुळे दुकानदारांना लाभार्थ्यांना मंजूर असलेल्या परिमाणाएवढे शंभर टक्के धान्य द्यावेच लागणार आहे. लाभार्थ्यांनी दरमहा आपल्या हक्काच्या धान्याची उचल करावी, दुकानदारांना मागणी करावी, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी शिंदे यांनी केले आहे.