अकोला जिल्ह्यातील १६ गावांतील जलशुद्धीकरण यंत्रे परत घेण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:21 PM2019-02-06T12:21:45+5:302019-02-06T12:21:50+5:30
अकोला : जिल्ह्यातील ५७ गावांमध्ये यंत्रणा उभारण्यात आली; मात्र शुद्ध पाण्याची मागणीच नसल्याने १६ गावांतील यंत्रे परत घेऊन ती इतरत्र बसविण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने केली आहे.
अकोला : ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यात हानिकारक रसायनांसोबतचे ते पाणी कमालीचे दूषित असल्याने जलशुद्धीकरण यंत्राद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ५७ गावांमध्ये यंत्रणा उभारण्यात आली; मात्र शुद्ध पाण्याची मागणीच नसल्याने १६ गावांतील यंत्रे परत घेऊन ती इतरत्र बसविण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने केली आहे.
राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून जिल्ह्यातील पाण्याची गुणवत्ता खराब असलेल्या २० गावांमध्ये पहिल्या टप्प्यात जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५७ गावांमध्ये यंत्रे बसविण्याला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी अनेक गावांमध्ये यंत्रे बसविण्यात आली; मात्र अनेक गावांमध्ये यंत्रे बंद होती. त्यापैकी आठ गावांतील संयंत्रे सुरुवातीपासूनच बंद आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने सर्वच ग्रामपंचायतींना अंतिम नोटीसही बजावली होती. त्यामध्ये जलशुद्धीकरण यंत्रांची गरज नसल्यास इतर गावांमध्ये बसविण्यासाठी ती परत घेण्यात येतील, याबाबत म्हणणे सादर करण्याचे बजावले होते. त्यानंतर आता १६ गावांना नोटीस बजाविण्यात येत आहे. त्यासाठी उद्या बुधवारी जिल्हा परिषदेत संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवकांची बैठक बोलाविण्यात आली आहे.
- यंत्रे परत घेतली जाणारी गावे!
अकोला : आपोती बुद्रूक, दहीगाव गावंडे, धोतर्डी, लोणी, यावलखेड, निंबी मालोकार. अकोट : तरोडा, कावसा बुद्रूक, लामकाणी. बार्शीटाकळी : टिटवा, दगडपारवा. मूर्तिजापूर : लाखपुरी, रोहणा, मुंगशी. तेल्हारा : उबारखेड, नर्सिपूर या गावांतील यंत्रे परत घेतली जाणार आहेत.
- अनेक गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बंद
ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी असलेली जलशुद्धीकरण संयंत्रेच बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा, टिटवा कान्हेरी सरप, एरंडा, घोटा येथे जलशुद्धीकरण यंत्र बंद आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी येथे पंप बंद होते.
- १० ते २५ पैसे लीटरने पुरवठा
ग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलशुद्धीकरण संयंत्रे आहेत. ग्रामपंचायतींच्या देखरेखीखाली ती चालविली जातात. त्यासाठी ग्रामस्थांकडून शुल्क घेतले जाते. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये १० पैसे लीटर, तर काही गावांमध्ये १५ आणि २५ पैसे लीटरप्रमाणे शुल्क घेतले जाते.