अकोला : ‘कासोधा’च्या आश्वासनपूर्तीसाठी पुन्हा आंदोलनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:58 AM2018-01-31T00:58:21+5:302018-01-31T01:02:27+5:30
अकोला : कासोधा परिषदेनंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला देशव्यापी प्रसिद्धी मिळाली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्या मान्य केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कासोधा परिषदेनंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला देशव्यापी प्रसिद्धी मिळाली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्या मान्य केल्या. १५ जानेवारीपर्यंत या मागण्यांची पूर्तता होईल, असे पत्रही प्रशासनाने आंदोलकांना दिले. मात्र, आंदोलनातील मागण्यांच्या पूर्ततेच्या दिशेने एकही पाऊल उचलले नाही. याबाबत आता सरकाराला जाब विचारण्यासाठी यशवंत सिन्हा पुन्हा अकोल्यात येणार असून, त्यांच्या सोबतीला शत्रुघ्न सिन्हाही असतील, अशी माहिती शेतकरी जागर मंचच्यावतीने देण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर, शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या चर्चेदरम्यान शेतकर्यांच्या मागण्या मान्य असल्याचे जिल्हाधिकार्यांनी लेखी दिले होते. आंदोलनाचे हे मोठे यश होते. आंदोलनाची वाढलेली व्याप्ती, सत्ताधारी भाजपा वगळता सर्वच पक्षांनी दिलेला पाठिंबा पाहता, या मागण्यांबाबत शासन तत्परतेने कारवाई करेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र या मागण्यांसंदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नाही. मंगळवारी दिल्ली येथे यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात ‘राष्ट्रमंच’ची पायाभरणी झाली आहे. या बैठकीसाठी अकोल्यातून दिल्ली येथे गेलेल्या शेतकरी जागर मंचच्या पदाधिकार्यांसोबत यशवंत सिन्हा यांनी चर्चा केली.
या चर्चेमध्ये कासोधाच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी यशवंत सिन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आधी संवाद साधणार असून, त्यानंतर आंदोलनाची भूमिका घेणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे प्रख्यात अभिनेते व भाजपाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही सदर आंदोलनासाठी अकोल्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
कासोधा आंदोलनाच्या सांगतेप्रसंगी प्रशासनामार्फत शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी सरकारची आहे. मात्र, सरकारकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आता सरकारवर दबाव निर्माण करण्याची भूमिका घेणार आहोत. दिल्ली येथे यशवंत सिन्हा व शत्रुघ्न सिन्हा यांच्या उपस्थितीत चर्चा झाली व दोघांनीही अकोल्यात आंदोलनासाठी येण्याची तयारी दर्शविली आहे.
- प्रशांत गावंडे,
शेतकरी जागर मंच