मतमोजणीची तयारी सुरू; गावागावात उत्कंठा शिगेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:17 AM2021-01-17T04:17:05+5:302021-01-17T04:17:05+5:30

अकोला : जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, १८ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानुषंगाने प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर ...

Preparations for the counting of votes begin; Curiosity shines in villages! | मतमोजणीची तयारी सुरू; गावागावात उत्कंठा शिगेला!

मतमोजणीची तयारी सुरू; गावागावात उत्कंठा शिगेला!

Next

अकोला : जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, १८ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानुषंगाने प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर मतमोजणीची तयारी सुरू करण्यात आली असून, ४ हजार ४११ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतमोजणीत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावागावांत आता निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेेेेण्यात आल्या. त्यामध्ये १० ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींच्या १ हजार ७४१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात सरासरी ७४.१७ टक्के मतदान झाले असून, निवडणूक लढवीत असलेल्या ४ हजार ४११ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्राॅनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) सीलबंद झाले. ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार असून, जिल्ह्यातील सातही तहसील स्तरावर प्रशासनामार्फत मतमोजणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक निकालात कोण बाजी मारणार आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार, याबाबत जिल्ह्यातील गावागावांत ग्रामस्थांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

तालुकास्तरावर ‘या’ ठिकाणी होणार मतमोजणी!

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी संबंधित तालुकास्तरावर होणार आहे. त्यामध्ये तेल्हारा येथील नवीन इमारत तहसील कार्यालय, अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कास्तकार सभागृह, मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालय परिसरातील नवीन शासकीय धान्य गोदाम क्र.४, अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय धान्य गोदाम, बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम, बार्शी टाकळी येथील पंचायत समिती मनरेगा कक्ष व पातूर येथील तहसील कार्यालय सातबारा संगणकीकरण विभाग इत्यादी ठिकणी ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी जिल्ह्यातील तहसील कार्यालय स्तरावर १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू होणार आहे. मतमोजणी पथके गठित करण्यात आली असून, जिल्ह्यातील तहसील कार्यालयांकडून मतमोजणीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी

Web Title: Preparations for the counting of votes begin; Curiosity shines in villages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.