सर्वच केंद्र शाळा आदर्श करण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 02:45 PM2019-10-20T14:45:06+5:302019-10-20T14:45:13+5:30
सर्वच केंद्र शाळा आदर्श करण्याची तयारी
अकोला: जिल्हा परिषदेच्या सर्वच केंद्र शाळा आदर्श करण्याची तयारी शिक्षण विभागाने करावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत दिले. सोबतच शिक्षण विभागाचे विविध उपक्रम पूर्ण करण्याचेही त्यांनी बजावले.
बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोहाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी एस.जे. मानमोठे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग, दिलीप तायडे उपस्थित होते. सभेत शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व केंद्र शाळांना नियमित भेटी द्याव्या, सर्व केंद्र शाळांचे रेकॉर्ड अद्ययावत करावे, जिमसाठी/क्रीडा सुविधेसाठी शाळांची यादी तयार करावी, शगुण पोर्टलबाबत कार्यवाही करावी, सर्व केंद्र शाळा आदर्श करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचेही निर्देश सभेत देण्यात आले. त्याशिवाय, बदली हवी असलेल्या शिक्षकांचे अर्ज स्वीकारणे, गंभीर आजारी, अत्यावश्यक गरज असलेल्या शिक्षकांचे प्रथम प्राधान्याने शाळा स्तरावर समायोजन करणे, पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या शिक्षकाचे वेतन शालार्थ प्रणालीतून काढावे, दुरुस्तीची गरज असलेल्या शाळांची यादी तयार करावी, गरज असल्यास शाळा व्यवस्थापन समितीने अंशकालीन शिक्षकांची निवड करावी, सर्व शाळांनी शाळासिद्धीच्या मुद्यांप्रमाणे कार्यवाही करावी, शाळा भेटीचे नियोजन करणे, मुख्यध्यापक, मदतनीस यांना प्रशिक्षण देणे, आरटीई अनुदानाच्या प्रतिपूर्तीसाठी शाळा अपात्र का ठरल्या, याची माहिती कारणासह सादर करण्याचेही सभेत बजावण्यात आले. यावेळी स्वीय सहायक भटकर, बडगुजर, शाहू भगत, रोशन डामरे, गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी उपस्थित होते.