शिर्ला परिसरात वादळ वाऱ्यासह पावसाची हजेरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:16 AM2021-05-29T04:16:05+5:302021-05-29T04:16:05+5:30
पातूर तालुक्यातील शिर्ला परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वादळ वाऱ्यामुळे सोळा मैल परिसरातील घरांवरील उडालेली टिनपत्रे. शिर्ला ...
पातूर तालुक्यातील शिर्ला परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वादळ वाऱ्यामुळे सोळा मैल परिसरातील घरांवरील उडालेली टिनपत्रे.
शिर्ला : परिसरात वादळ वाऱ्यासह पावसाने शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली. सोळा मैल वस्तीतील अकरा घरावरील छपरे उडाली. पावसामुळे घराघरातील सर्व साहित्य भिजले. तसेच काही भागात झाडे उन्मळून पडली होती. झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. हवेचा वेग जास्त असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने जीवित हानी झाली नाही, मात्र पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
पातूर तालुक्यातील शिर्ला परिसरात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. सद्यस्थितीत शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामात व्यस्त आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, परिसरात शेती मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. शिर्ला परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सोळा मैल वस्तीतील अकरा जणांच्या घरावरील छपरे उडाली. छपरे उडालेल्या घरातील सर्व प्रकारचे साहित्य भिजले. अस्मानी संकटामुळे गरीब कुटुंबांची दाणादाण उडाली आहे. परिसरातील नामदेव (राजेश) तुकाराम खर्डे, नितीन रामभाऊ खर्डे, महादेव नारायण खरडे, गणेश जयाजी खर्डे, सतीश एकनाथ डाळे, रामा डाळे, अर्जून बळकार, राजकन्या राजेश गवई, रुपाली बोरकर, विश्वास गवई, रामदास लक्ष्मण बळकार आदींचा समावेश आहे.
--------------------
मदतीची मागणी
अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे गरीब कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागात सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. लाकडाऊनमुळे आधीच संकटात असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासकीय मदतीसह समाजातून मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे.
--------------------------
नांदखेड, भंडारज परिसरातही पावसाच्या सरी
वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शिर्ला परिसरातील झाडे उन्मळून पडली होती. तसेच तालुक्यातील नांदखेड, भंडारज, तांदळी या गावांतही पावसाच्या सरी कोसळल्याची माहिती आहे.
-----------------------------------
वीज पुरवठा खंडित
शिर्ला परिसरात पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित झाला होता. काही भागात झाडांच्या फांद्या तुटून वीज तारांवर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
-------------------------------
===Photopath===
280521\img_20210528_183939.jpg
===Caption===
घरावरील छपरे उडाली शिर्ला सोळा मैल