सद्यस्थितीत परराज्यातील मजुरांना घरी जाण्याची परवानगी नाही - गृहमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 09:53 AM2020-04-21T09:53:12+5:302020-04-21T09:53:19+5:30
सध्याच्या परिस्थितीत परराज्यातील या व्यक्तींना घरी जाण्याची परवानगी देता येणार नाही. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘लॉकडाउन’मध्ये अकोला जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील २ हजार ४८ मजुरांची जिल्ह्यातील २५ ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. आश्रित व्यक्तींना आपल्या गावात जायचे आहे; मात्र सध्याच्या परिस्थितीत परराज्यातील या व्यक्तींना घरी जाण्याची परवानगी देता येणार नाही. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोरोना संकटाचा सामना करत असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन समन्वयाने व सहकार्याने काम करावे असे आवाहन देशमुख यांनी केले.
प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती आणि सुरु असलेल्या उपाययोजना याबाबत माहिती दिली.
लोकप्रतिनिधींनी मांडल्या सूचना!
केशरी शिधापत्रिकाधारकांना १ मेपासून सवलतीच्या दरात धान्याचे वाटप सुरु होणार आहे; मात्र तोपर्यंत वाट न पाहता २६ एप्रिल रोजी असणाºया अक्षय तृतीयेपूर्वी गरिबांना धान्याचे वाटप सुरू करण्याची सूचना आमदार गोवर्धन शर्मा यांनी मांडली. तसेच शेतकऱ्यांना माल वाहतुकीसाठी दिलासा देण्याची मागणी आमदार हरीश पिंपळे यांनी केली. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीही यावेळी सूचना मांडल्या .
आमदार देशमुख यांच्याकडे भेट
आढावा बैठकीनंतर ना.अनिल देशमुख यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी विजयराव देशमुख, गोपाल दातकर, सुनील धाबेकर, अनिरूद्ध देशमुख, दिलीप बोचे, बंडू देशमुख, राहुल कराळे, अमोल मिटकरी आदी उपस्थित होते. ना.देशमुख यांनी स्रेहभोजनानंतर यवतमाळकडे प्रयाण केले.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
ना.देशमुख यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आलेल्या कार्यकर्त्यांमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
आश्रित व्यक्तींमध्ये अस्वस्थतेची भावना -संजय धोत्रे
‘लॉकडाउन’मध्ये अडकलेल्या परराज्यातील मजुरांची निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे; मात्र घरी केव्हा जाता येईल, यासंदर्भात परराज्यातील आश्रित व्यक्तींमध्ये थोडीफार अस्वस्थतेची भावना आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनामार्फत समन्वयाने काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.