राष्ट्रपती निवडीचा जल्लोष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:30 AM2017-07-21T01:30:42+5:302017-07-21T01:30:42+5:30
भाजपा कार्यालयासमोर आतषबाजी : लोकप्रतिनिधींनी धरला फेर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राष्ट्रपती पदासाठी भाजपाप्रणीत रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी ६६ टक्के मते घेऊन विजय संपादित केला. देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून कोविंद यांची निवड होताच भाजपाचे लोकप्रतिनिधी,पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला.
भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील, महापौर विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले, अकोला तालुका अध्यक्ष अनिल गावंडे, मा.जि.प. अध्यक्ष श्रावण इंगळे, वसंत बाछुका, सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार, रावसाहेब कांबे,चंदा शर्मा, रवी गावंडे, विलास पोटे, डॉ. विनोद बोर्डे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. साधी राहणी व उच्च विचार असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची निवड म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असण्यासोबतच प्रत्येक भारतीयाचा सन्मान असल्याचे खा. संजय धोत्रे यांनी सांगितले. भाजपाचा निर्णय देशहिताचा असून, रामनाथ कोविंद यांच्या रूपाने रामराज्याची संकल्पना साकार होण्याची ही सुरुवात असल्याचे प्रतिपादन आ. गोवर्धन शर्मा यांनी केले. समाजातील सर्वच घटकांनी देशाच्या विकासाला हातभार लावला आहे. भाजपाच्या नेतृत्वाला योग्य व्यक्तींची पारख असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी नमूद केले.
जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची हजेरी
रामनाथ कोविंद यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी पक्ष कार्यालयासमोर जिल्हाभरातून कार्यकर्ते दाखल झाले होते. अकोला तालुक्यातील म्हातोडी, म्हैसांग, आपातापा, अनकवाडी, चोहोट्टा परिसरातून परंपरागत ढोल, ताशे साहित्यासह गोंधळी समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी महापालिकेतील भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी आ. गोवर्धन शर्मा यांनी टाळ वाजवून कार्यकर्त्यांसोबत फेर धरला.