सराफा असोसिएशनच्या अध्यक्षाने केली चोरीच्या सोन्याची खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 10:59 AM2019-12-09T10:59:47+5:302019-12-09T11:02:37+5:30
सराफा असोसिएशनचा अध्यक्ष राजू वर्मा यानेच चोरीतील सोने खरेदी केल्याचे खळबळजनक वास्तव तपासात उघडकीस आले आहे.
- सचिन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन मोठ्या चोरीतील दोन चोरट्यांना अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून अकोला सराफा असोसिएशनचा अध्यक्ष राजू वर्मा यानेच चोरीतील सोने खरेदी केल्याचे खळबळजनक वास्तव तपासात उघडकीस आले आहे. वर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांवरच आगपाखड करीत ठाणेदाराचीच पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याचा आटापिटा करण्यात आला; मात्र पोलिसांचा दंडुका बसताच त्याने चोरीतील सोने खरेदी केल्याची कबुली देऊन खरेदी केलेले ९० ग्रॅम सोने पोलिसांना परत केले. यावरून अकोला सराफा बाजार चोरीचे सोने खरेदी करणारे राज्यातील मोठे केंद्रच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
नगर परिषद कॉलनीतील रहिवासी प्रशांत डंबेलकर, शैलेश अक्षय मिश्रा तसेच सिंधी कॅम्प परिसरातील पक्की खोली येथील रहिवासी परळीकर या तीन घरफोड्यात तब्बल १० लाख रुपयांचा मुद्देमाल पळविण्यात आला आहे. या चोरीचा तपास करताना खदानचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी नदीम बेग कलीम बेग आणि अ. रिजवान अब्दुल खालीद या दोन चोरट्यांना अटक केली. दोन्ही चोरटे १ डिसेंबरपासून पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांनी आतापर्यंत या तीनही चोऱ्यांची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या चोºयातील रोख १लाख रुपये, एक दुचाकी व १२ हजार रुपयांची चांदी जप्त केली आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत डंबेलकर यांच्या निवासस्थानी केलेल्या चोरीतील ९० ग्रॅम सोने या चोरट्यांनी सराफा असोसिएशनचा अध्यक्ष राजू ऊर्फ राजकुमार वर्मा याला विकल्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनी वर्मा याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली; मात्र वर्मा याने टाळाटाळ सुरू करीत पोलिसांवरच आरोप करण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरीचे सोने खरेदी केल्याचे पुरावेच पोलिसांनी त्याच्यासमोर ठेवल्यानंतर वर्मा याने सोने खरेदी केल्याची कबुलीच पोलिसांसमोर देऊन ९० ग्रॅम सोने पोलिसांच्या स्वाधीन केले. हे सोने डंबेलकर यांच्या घरातील असून, त्यांना लवकरच परत करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली उलट चौकशी
खदान पोलिसांनी सराफा असोसिएशनचा अध्यक्ष राजू वर्मा याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून ९० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले; मात्र याच वेळी खदान पोलिसांवर विविध आरोप केल्याने या प्रकरणाची चौकशी शहर पोलीस उपअधीक्षक यांनी केली. त्यांच्या चौकशीतही चोरीचे सोने सराफा असोसिएशनचा अध्यक्ष राजू वर्मा याने खरेदी केल्याचे उघड झाले. त्यामुळे ही असोसिएशन तोंडघशी पडल्याचे दिसून आले.
पोलीस अधीक्षकांकडे शिष्टमंडळ नेण्याचा डाव
पिवळ्या सोन्याचा व्हाइट कॉलर काळा धंदे करणाºया अकोल्यातील सराफांवर आतापर्यंत बहुतांश वेळा चोरीच्या सोने खरेदी-विक्री केल्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे; मात्र ह्यचोर ते चोर वरून शिरजोरह्ण अशी म्हण प्रत्यक्षात आणण्यासाठी हेच सराफा संबंधित पोलीस अधिकाºयावर आरोप करून त्यांच्याविरुद्ध पोलीस अधीक्षकांकडेच शिष्टमंडळ घेऊन जाण्याचा डाव आखतात. या प्रकरणातही सराफा असोसिएशनच्या अध्यक्षाला ताब्यात घेताच अकोल्यातील सराफांनी दबावतंत्र निर्माण केले; मात्र पोलिसांनी भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे या चोरीतील तब्बल ९० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात यश आले.
कोकणातील चोरटा आला होता अकोल्यात
४कोकणातील रायगड जिल्हयात घरफोड्या केल्यानंतर सदरच्या चोरीतील सोने विक्री करण्यासाठी कोकणातील एक चोरटा ६ महिन्यांपूर्वी अकोल्यातील गांधी रोडवर आला होता.
या चोरट्याने गांधी रोडवरील मंदिरानजीक असलेल्या एका सराफाकडे चोरीचे सोने विक्री करण्यासाठी व्यवहार केला होता; मात्र नेमके याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेने चोरट्यास अटक केल्याने व्यवहार अर्धवट राहिला. त्यानंतर अद्यापही त्या सराफावर कारवाई झालेली नाही. हा सराफाही चोरीचे सोने खरेदी करण्यात पटाईत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलिसांना माफी मागण्यासाठी आटापिटा
चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी राजू वर्मा याला ताब्यात घेताच त्याच्यासह सराफा असोसिएशनने आधी पोलिसांसोबत मुजोरी करण्याचा प्रयत्न केला.
पोलीस चौकशीत वास्तव उघड होताच खदान पोलिसांसह वरिष्ठ पोलिसांना माफी मागण्याचा आटापिटा या असोसिएशनच्यावतीने करण्यात आला. केवळ एका चोरीतील ९० ग्रॅम सोने असोसिएशनच्या अध्यक्षनेच खरेदी केल्याचे उघड झाल्यानंतर अशा अनेक चोºयातील सोने खरेदी करणाºया सराफांचेही आता बिंग फुटण्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांसमोर लोटांगण घातल्याची माहिती आहे.
चोरट्यांनी दिलेल्या माहितीनुसार सराफा राजू वर्मा याला ताब्यात घेतले आहे. चोरीच्या सोने खरेदीसंदर्भात चौकशी केली.सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर दोन चोरट्यांकडून ९0 ग्रॅम सोने खरेदी केल्याची कबूली त्याने दिली. त्याच्याकडून ते सोने जप्त करण्यात आले.
- उत्तमराव जाधव, ठाणेदार खदान पोलीस स्टेशन