शाळाबाह्य चिमुकल्या भावंडांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा; प्रेस क्लबने घेतली शिक्षणाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:17 PM2018-09-18T13:17:32+5:302018-09-18T13:19:50+5:30
शिक्षणापासून वंचित असलेल्या या चिमुकल्या भावंडांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना सोमवारी जिल्हा परिषद शाळेत दाखल करून त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला.
- राजेश अस्वार
हिवरखेड (अकोला): आई-वडिलांना बाराखडीही माहिती नाही. केवळ पोटासाठी दुसऱ्याच्या शेतात राबणं, एवढंच त्यांना माहीत. दोन वेळच्या भ्रांतापायी त्यांची दोन चिमुकले मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत, याचेही त्यांना भान नाही. अशा परिस्थितीत तालुका बालरक्षक तुलसीदास खिरोडकर यांनी या आई-वडिलांना शिक्षणाचे महत्त्व सांगत, त्यांचे मतपरिवर्तन केले. एवढेच नाही तर शिक्षणापासून वंचित असलेल्या या चिमुकल्या भावंडांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना सोमवारी जिल्हा परिषद शाळेत दाखल करून त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला.
मध्यप्रदेशातून रोजगारासाठी पती, दोन चिमुकली मुले हिना आणि धनराज यांच्यासोबत नंदकिशोर टाखेर हे सोनवाडी येथील माजी सरपंच बाळूभाऊ खिरोडकर यांच्या शेतात आले आहेत. दोन वेळच्या जेवणाची सोय करताना, त्यांना चिमुकली दोन मुले शिक्षणापासून वंचित आहेत, याचे भानही नव्हते. शेतात राबणाºया आई-वडिलांसोबत चिमुकल्या हिना व धनराजचा दिवस जायचा. खायलाच पैसा नाही तर शिक्षणासाठी कुठून आणायचा, अशा परिस्थितीत शेतात जीवन व्यतीत करणाºया हिना व धनराज या शाळाबाह्य बालकांवर तेल्हारा तालुका बालरक्षक तुलसीदास खिरोडकार यांची नजर गेली. त्यांनी पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगत मतपरिवर्तन केले आणि दोघाही भावंडांना हिवरखेड येथील जि.प.कन्या व मुलांच्या शाळेत दाखल केले. आता त्यांच्या आयुष्यातील बाराखडीची अक्षरे गिरविण्याचा श्रीगणेशा झाला. ग्रामीण भागात हिना व धनराजसारखी अनेक शाळाबाह्य मुले भटकताना दिसून येतात. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यास, खºया अर्थाने ज्ञानगंगेच्या प्रवाहाला आणखीन गती येईल...
हिवरखेड प्रेस क्लबने स्वीकारले पालकत्व
या दोन्ही बालकांचे पालकत्व हिवरखेड प्रेस क्लबने स्वीकारून त्यांना स्कूलबॅग, वॉटरबॅग टिफिनबॉक्स व शालेय साहित्य शाळा प्रवेश प्रसंगी भेट दिल्या, तसेच या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी प्रेस क्लबने स्वीकारली. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मनीष भुडके, पत्रकार किरण सेदानी केंद्रप्रमुख प्रकाश राऊत, मुख्याध्यापक श्यामराव इंगळे, प्रकाश ढोकणे, साधना भोपळे, सुनंदा भुडके, नीलेश खिरोडकर, हर्षल खिरोडकर आदी उपस्थित होते.