जिल्ह्यातील ११ ठिकाणच्या गावठी दारू अड्ड्यावर छापासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:19 AM2021-04-28T04:19:43+5:302021-04-28T04:19:43+5:30
उत्पादन शुल्क विभागाने राबविली दोन दिवस मोहीम अकोला : जिल्ह्यातील गावठी दारू अड्डे तसेच देशी व विदेशी दारूची ...
उत्पादन शुल्क विभागाने राबविली दोन दिवस मोहीम
अकोला : जिल्ह्यातील गावठी दारू अड्डे तसेच देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री होत असल्याच्या माहितीवरून उत्पादन शुल्क विभागाच्या प्रमुख स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाने दोन दिवस जिल्हाभर छापासत्र राबविले. या मोहिमेमध्ये तब्बल ११ ठिकाणचे दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून, सुमारे एक लाख रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणावरील १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, १२ जणांना अटक करण्यात आली आहे, तर एकजण फरार झालेला आहे.
कोरोनाच्या भीषण संकटातही जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गावठी दारूचे अड्डे मोठ्या प्रमाणात फोफावल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका स्नेहा सराफ यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी २५ व २६ एप्रिल रोजी जिल्हाभरात छापासत्र राबविण्याचे निर्देश दिले. यावरून उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाभर दोन दिवस छापासत्र मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील पळसो बढे, आगर, मोरळ, मूर्तिजापूर तालुक्यातील उमरी, बार्शीटाकळी तालुक्यातील राहित, पिंपळगाव चांभारे, अकोला शहरातील शास्त्रीनगर, गवळीपुरा, सिंधी कॅम्प यासह विविध गावठी दारू अड्ड्यांवर छापेमारी केली. या ११ ठिकाणच्या छापेमारीतून २५७ लिटर मोहापासून बनविलेला सडवा, ३ हजार १२५ लिटर देशी दारू व २५ लिटर गावठी दारू असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ११ दारू अड्ड्यांवरील १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, १२ जणांना अटक करण्यात आली आहे. एक दारू अड्डा बेवारस असल्याची माहिती आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली डी. के. क्षीरसागर, आ. ग. काळे, डी. एस. वाघ, एस. के. पाटील, आर. एम. डामरे, एस. नौरंगाबादे, डी. एच. त्रिपाठी, बाबलकर, शेगोकार, जाधव, गावंडे, कोमल शिंदे, चालक कासदेकर यांनी केली.