बडतर्फ कनिष्ठ अभियंत्याला सेवेत घेण्यासाठी दबावतंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:21 AM2021-02-09T04:21:29+5:302021-02-09T04:21:29+5:30
नवनियुक्त आयुक्त निमा अराेरा यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारून अवघ्या चाेवीस तासांचा अवधी उलटत नाही ताेच काॅँग्रेसमधील काही आजी, ...
नवनियुक्त आयुक्त निमा अराेरा यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारून अवघ्या चाेवीस तासांचा अवधी उलटत नाही ताेच
काॅँग्रेसमधील काही आजी, माजी नगरसेवक, नगरसेविका पती यांनी प्रशासन विभागातील एका कर्मचाऱ्याला घरून उचलून आणत धाकदपट केल्याचा प्रकार घडला आहे. मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील एका कनिष्ठ मानसेवी अभियंत्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली हाेती. याप्रकरणी प्रशासनाने संबंधित अभियंत्याला सेवेतून काढून टाकले हाेते. काेराेनाच्या कालावधीत या बडतर्फ कर्मचाऱ्याने पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे अर्ज सादर केला. निकषानुसार मानसेवी कर्मचाऱ्याला सेवेतून कमी केल्यानंतर पुन्हा सेवेत घेता येत नाही. अशास्थितीत बडतर्फ कर्मचाऱ्याला सेवेत सामावून घेण्यासाठी काॅंग्रेसमधील काही आजी, माजी नगरसेवक व नगरसेविका पतींनी सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर केल्याचे समाेर आले आहे.
रात्री तयार केली फाइल
सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी नियुक्तीची फाइल तयार करीत नसल्याचे पाहून त्यांना शुक्रवारी रात्री घरून महापालिकेत आणन्यात आले. याठिकाणी फाइल तयार करण्यात आली. तसेच पुढील मंजुरीसाठी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे सादर करण्याचा धमकीवजा इशारा दिला.
कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव
मनपाच्या सभागृहात प्रशासनाच्या कामकाजावर आक्षेप घेऊन घसे काेरडे करणारे काही पदाधिकारी व नगरसेवक अनेकदा कर्मचाऱ्यांना नियमबाह्य काम करण्यासाठी प्रवृत्त करतात. सूचनेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धाकदपट व विभागातून बदली करण्याची धमकीही दिली जाते. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत मग्रुरीची भाषा करणारे अनेक पदाधिकारी व नगरसेवक बिळात दडून बसले हाेते. अशा नगरसेवकांना मनपा आयुक्त निमा अराेरा कशा पध्दतीने सामाेरे जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.