‘कोरोना’वर प्रतिबंधात्मक उपाय हाच बचाव! - डॉ. फारुख शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 02:57 PM2020-03-15T14:57:29+5:302020-03-15T14:58:00+5:30
सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा सल्ला महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी दिला आहे.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘कोरोना’विषयी अनेक समज, गैरसमज पसरले आहेत. अशातच ऋतुबदलाच्या काळात सर्दी, खोकला आणि ताप आदी समस्या उद््भवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे; परंतु सर्दी, ताप, खोकला म्हणजे कोरोना नाही. मुळात कोरोनाचा संसर्ग हा त्याची लागण झालेल्या व्यक्तींकडूनच पसरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला न घाबरता सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा सल्ला महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी दिला आहे.
विदेशातून येणाऱ्या नागरिकांपासून ‘कोरोना’चा धोका आहे का?
जोपर्यंत त्या व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीपासून कोरोनाचा धोका नाही; मात्र सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. म्हणून अशा व्यक्तींनी वैद्यकीय तपासणी करून १४ दिवसांसाठी इतरांच्या सहवासात येणे टाळावे, जेणेकरून संभाव्य धोका टाळता येऊ शकतो, असे केल्यास अशा व्यक्तींकडून धोका नाही.
अकोलेकरांना ‘कोरोना’चा धोका आहे का?
मुळात कोरोना विषाणू स्थानिक लोकांमध्ये नाही. त्यामुळे त्याचा धोका नाही; परंतु विदेशातून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल आणि त्याच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली असेल, तर त्या व्यक्तीला कोरोनाचा धोका संभवू शकतो.
‘कोरोना’चा धोका टाळता येऊ शकतो का?
नक्कीच, प्रतिबंधात्मक उपाययोजनेतून कोरोनाचा धोका टाळता येऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी हॅण्ड सॅनिटायझर किंवा साबणाद्वारे नियमित हात धुवावे. नाक, टोळे तसेच तोंडाला हात लावणे टाळावे. सर्दी, खोकला, ताप असेल तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरित सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करावी.
विदेशातून येणाºया नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्याशिवाय कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत नाही. त्यामुळे विदेशातून आलेल्या व्यक्तींनी आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार, १४ दिवस घरात स्वतंत्र खोलीत राहावे, इतरांशी संपर्क टाळावेत, नियमित सर्जिकल मास्कचा उपयोग करावा.
‘कोरोना’विषयी नागरिकांची जबाबदारी काय असावी?
सर्वप्रथम नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवूनये, कोणी अफवा पसरवत असेल, तर त्याला कोरोनाविषयी योग्य माहिती द्यावी, सोशल मीडियावर कुठलाही रुग्ण किंवा संशयित रुग्णाचे नाव त्यांचे फोटो व्हायरल करूनये, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे.