मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:01 PM2019-10-16T18:01:17+5:302019-10-16T18:08:40+5:30
अकोला : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात मतदान व मतमोजणी होणार आहे. सिलबंद मतदान यंत्रे व ...
अकोला: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात मतदान व मतमोजणी होणार आहे. सिलबंद मतदान यंत्रे व संबंधित साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील पाचही मतदान मोजणी केंद्रांवर १०० मिटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी आदेश् निर्गमित केले.या सर्व मतमोजणी केंद्रांच्या १०० मिटर परिसरात रविवार दि.२० ते शुक्रवार दि.२५ या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.
- मतदार संघ निहाय मतमोजणीची ठिकाणे
- अकोट - औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिवरखेड रोड, अकोट पो.स्टे. अकोट शहर.
- बाळापुर - शासकीय धान्य गोदाम, ऊर्दू डी.एड. कॉलेजच्या बाजूला, बाळापूर पो. स्टे. बाळापूर.
- अकोला पश्चिम- शासकीय गोदाम,मंगरुळ पीर रोड, अकोला पोस्टे खदान
- अकोला पुर्व- शासकीय गोदाम,मंगरुळ पीर रोड, अकोला पोस्टे खदान
- मुर्तिजापूर- शासकीय गोदाम, उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ, मुर्तिजापुर पो. स्टे. मुर्तिजापूर शहर.
असे आहेत प्रतिबंध
१) मतमोजणीच्या वेळी मतमोजणीच्या केंद्रामध्ये अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही.
२) ज्यांना प्राधिकृत पास देण्यात आला आहे त्यांना मोबाईल फोन सोबत ठेवता येणार नाही.
३) शासकीय वाहना व्यतिरिक्त अन्य वाहनांना प्रवेश देता येणार नाही.
४) मतमोजणी केंद्रापासून १०० मिटर पलिकडे वाहनांचे पार्किंग करावे लागेल.
५) मतमोजणी कक्षात चित्रीकरणाची परवानगी देता येणार नाही.
६) ज्वालाग्राही पदार्थ, वस्तू बाळगता येणार नाही.
७) मतमोजणी संपेपर्यंत १०० मिटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशिन, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी मतमोजणी संपे पर्यंत बंद ठेवण्यात येतील.
८) मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी बाधा निर्माण करणारे कोणतेही कृत्य करता येणार नाही.
९) अनधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई.
१०) हे प्रतिबंधात्म आदेश नियुक्त कर्मचारी, देखरेख करणारे अधिकारी- कर्मचारी यांना कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने लागू राहणार नाहीत.