आधी घेतला फेरफार, त्याच नोंदीसाठी पुन्हा सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 03:07 PM2020-02-17T15:07:50+5:302020-02-17T15:08:04+5:30
२२ जुलै २०११ च्या खरेदीनुसार त्याच १३ आर जमिनीची नोंद करण्याचा अर्ज मेघश्याम मालेगावकर यांनी २९ जानेवारी २०१९ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केला.
अकोला : तुकडेबंदी असताना केवळ कापशी येथील १३ आर जमिनीच्या फेरफार प्रकरणात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, मेघश्याम मालेगावकर यांनी केलेल्या खरेदी, फेरफाराची चौकशी करून न्याय न दिल्यास २२ फेब्रुवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा रामकरण केवट व पार्वताबाई केवट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनात दिला आहे.
अर्जदारांनी १० मे २०१९ रोजीच या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यामध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष थोरात, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी मालेगावकर यांनी कापशी रोड येथील सर्व्हे क्रमांक ४१ मधील जमिनीची मालकी व ताब्यासंदर्भात चौकशीची मागणी केली. या गटातील ६४ आर शेतीचा ताबा केवट कुटुंबीयांकडेच आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष थोरात यांनी त्यापैकी १३ आरची खरेदी २२ जुलै २०११ रोजी करून घेत त्याची नोंद ६ फेबु्रवारी २०१८ रोजी करून घेतली. त्यानंतर २२ जुलै २०११ च्या खरेदीनुसार त्याच १३ आर जमिनीची नोंद करण्याचा अर्ज मेघश्याम मालेगावकर यांनी २९ जानेवारी २०१९ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केला. त्यावर ४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुनावणी ठेवण्यात आली. त्याची नोटीसही केवट कुटुंबीयांना देण्यात आली. दरम्यान, त्या १३ आर जमिनीची नोंद आधीच म्हणजे, २७ फेब्रुवारी २०१८ रोजीच मालेगावकर यांच्या नावे झाली होती. त्यात हितसंबंधितांना नोटीसही ११ फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्याचे नमूद आहे. या प्रकाराने मालेगावकर यांनी आधीच नोंद झाली असताना त्यासाठी २०१९ मध्ये अर्ज केला. त्यापूर्वी नोंद झाली कशी, तसेच दिवाणी न्यायालयाचा मनाई हुकूम असतानाही भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष थोरात यांनी मालेगावकर यांना जमिनीची विक्री केली. त्यासाठी तुकडेबंदी कायद्याचा भंगही करण्यात आला. त्याबाबत महसूल विभागाकडून कोणतीही कार्यवाहीच होत नाही. राजकीय दबावतंत्राचा वापर होत असल्याने कायदेशीर बाबींकडेही दुर्लक्ष करून न्याय नाकारला जात आहे. आता न्याय मिळत नसल्यास २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच आत्मदहन करण्याचा इशारा केवट पती-पत्नीने १४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदनातून दिला आहे.
महामार्गाच्या मोबदल्यासाठी घोळ
बेकायदेशीरपणे खरेदी करून त्याची नोंद करून घेण्याचा प्रकार राष्ट्रीय महामार्गात संपादित होणाºया जमिनीच्या लाखो रुपयांच्या मोबदल्यासाठी करण्यात आला. केवट कुटुंबीयांकडून जमीन मोबदल्याचा लाभ हिरावून घेण्यात आला आहे.