दहीहांडा परिसरात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:19 AM2021-04-20T04:19:14+5:302021-04-20T04:19:14+5:30
लॉकडाऊन असल्यामुळे मजूर वर्ग रिकामा झाला आहे. जवळचे होते, नव्हते सर्व खर्च करून टाकले. मजूर वर्ग व सामान्य जनतेला ...
लॉकडाऊन असल्यामुळे मजूर वर्ग रिकामा झाला आहे. जवळचे होते, नव्हते सर्व खर्च करून टाकले. मजूर वर्ग व सामान्य जनतेला बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मागील सहा महिन्यांपर्यंत महाराष्ट्र शासनाने जनतेला प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू आणि तांदूळ दिले होते. गहू आणि तांदळावर जीवन जगता येते का? जीवन जगण्याकरिता इतरही जीवनाश्यक वस्तूंची गरज भासते. नोव्हेंबर २०२० पासून गोरगरीब जनता कामधंद्यांच्या शोधात असून, कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करीत आहेत. आता पुन्हा लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे मजूर वर्ग, गोरगरीब जनतेसमोर संकट उभे थाटले आहे. मजूर वर्गाच्या हाताला कोणतेच प्रकारचे कामधंदे नसल्यामुळे मजूर वर्गावर व इतर छोट्या व्यापारी वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारल्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. दैनंदिन जीवनात खाद्यतेल लागतेच, सोयाबीन खाद्यतेलाचे भाव १४५ रुपये किलो, साखर ४० रुपये, गूळ ५० ते ६० रुपये किलो विकल्या जात आहे. काही महिन्यांपासून दहीहांडा येथील बाजार भरत नसल्यामुळे गोरगरीब जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बाजार भरत नसल्यामुळे बाहेर गावाचे व्यापारी येत नाहीत. गावातील काही व्यापारी याचा फायदा घेऊन सामान्य जनतेची लुबाडणूक करीत आहेत. दहीहांडा येथे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. भाजीपाला व्यापारी दामदुपटीने विक्री करीत आहेत. यासाठी बाहेरगावच्या व्यापारी वर्गाला गावात येऊन व्यापार करण्याची नियमानुसार परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच व्यापारी वर्गाकडून गोरगरीब जनतेची लूट थांबवावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.