परप्रांतीय बाजारपेठेत संत्र्याला मातीमोल भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:31 AM2020-12-05T04:31:30+5:302020-12-05T04:31:30+5:30
पान २ चे लीड बातमी ही घेणे गूगलवर संत्र्याचा फोटो सर्च करणे. संजय खासबागे वरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया ...
पान २ चे लीड बातमी ही घेणे
गूगलवर संत्र्याचा फोटो सर्च करणे.
संजय खासबागे
वरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुक्याची ख्याती आहे. येथील संत्र्याची देश-विदेशात चव चाखली जाते. तालुक्यात २० हजार हेक्टरवर हे पीक घेतले जाते. यावर्षी अंबिया बहराच्या संत्र्याचे उत्पादन चांगले असले तरी मोठ्या प्रमाणात भाव गडगडल्याने संत्रा उत्पादकांसह व्यापाऱ्यांनाही नुकसान सहन करण्याची वेळ आली. संत्र्याला २५० ते ५०० रुपये क्रेट व केवळ १० ते १५ रुपये किलोनुसार दर मिळत असल्याने उत्पादन खर्च काढणे दुरापास्त झाले आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले असून, ४० टक्के संत्री झाडावरच आहेत.
संत्र्याचा अंबिया बहर आणि मृग बहर घेतला जातो. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये वातावरण चांगले असल्याने अंबिया बहराची फूट समाधानकारक राहिली. मात्र, येथील अंबिया बहराच्या संत्र्यावर पंजाबच्या किन्नूने मात केली. बाजारपेठेत स्थानिक संत्र्याला भाव मिळत नाही. दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेश, केरळमध्ये संत्र्याचे भाव पडल्याची ओरड आहे. वैदर्भीय संत्र्याला परप्रांतीय बाजारपेठेत मातीमोल भाव मिळत आहे. आंदोलने, कोरोना प्रादुर्भावाचा फटकादेखील बसला आहे. बांग्लादेशातसुद्धा संत्र्याची परवड होत आहे.
वैदर्भीय संत्री २५० ते ५५० रुपये क्रेटने विकली जाते. यामध्ये तोडाई, भराई, मालवाहतूक असा बाजारपेठेपर्यंतचा खर्च २५० रुपयांच्या आसपास जातो. त्यामुळे उत्पादन व वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने संत्रा उत्पादक मेटाकुटीस आला आहे. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत पाणी सोडण्याची वेळ असते. मात्र, अद्यापही संत्री झाडावरच असल्याने उत्पादकांसह व्यापाऱ्यांनासुद्धा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे परप्रांतीय बाजारपेठेत महाराष्ट्र पणन महामंडळाचे कार्यालय उघडणे आवश्यक आहे. संत्र्याचे भाव कोलमडल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी थेट मार्केटिंगची सुविधा होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.
कोट
अंबिया बहराचे उत्पादन घेण्याकरिता नोव्हेंबरमध्ये पाणी सोडावे लागते. मात्र, संत्री झाडावरच असल्याने पाणी सोडता येत नाही. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ आली आहे.
- विजय श्रीराव, संत्रा उत्पादक, पुसला
----------