सरकीचे भाव एक हजार रुपयांनी वधारले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 02:22 PM2019-04-17T14:22:22+5:302019-04-17T14:22:39+5:30
सरकीचे भाव तब्बल एक हजार रुपयांनी वाढल्याने सरकीवरील प्रक्रिया साखळीतील तेल, ढेप आणि सरकी साबणाच्या किमतीवर परिणाम झाला आहे.
- संजय खांडेकर
अकोला : कापसापाठोपाठ आता सरकीचे भावही प्रतिक्विंटल एक हजार रुपयांनी वधारले आहेत. सरकीचे भाव तब्बल एक हजार रुपयांनी वाढल्याने सरकीवरील प्रक्रिया साखळीतील तेल, ढेप आणि सरकी साबणाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. पाच महिन्यांआधी दोन हजार रुपये क्विंटलने विकली जाणारी सरकी आता तीन हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरात पोहोचली आहे.
कापसाचे भाव पाच महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने चढतीवर असून, ते आता ६५०० प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले. कापसाचे भाव वधारल्याने कापसाच्या बोंडातून निघणाऱ्या सरकीचे भाव त्यापाठोपाठ वाढले आहे. जेवढी मागणी कापसाला आहे, तेवढीच मागणी सरकीलादेखील आहे. कारण एका क्विंटल कापसातून ६२-६३ टक्के सरकी आणि इतर ३६-३७ टक्के कापूस निघतो. त्यामुळे कापूस पिकातून सरकी जास्त निघत असल्याने सरकी प्रक्रिया साखळीत तेल, ढेप आणि साबण निर्मितीच्या उद्योगावरही परिणाम पडतो. सरकीचे भाव वधारल्याने सरकी तेल, ढेप आणि सरकीपासून तयार होणाºया साबणाच्या किमतीही काही अंतराने वाढल्या आहेत.
महाराष्ट्रातील ६० टक्के सरकी तेल गुजरातमध्ये
भारताच्या विविध प्रांतात विविध प्रकारच्या खाद्यतेलाची मागणी आहे. त्यात सोयाबीन, राईस, पाम, सरसो, खोबरा, जवस, शेंगदाणा यांचा समावेश आहे; मात्र गुजरातकडून सरकी तेलाची मागणी कायम असते. विविध प्रकारचे लोणचे घालण्यासाठी आणि दैनंदिन खाद्यासाठी गुजरातकडे सरकी तेलाची मागणी सर्वात जास्त असते. महाराष्ट्रात निर्मित ६० टक्के सरकी तेल गुजरातच्या एकट्या राज्यात जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कापूस आणि जवसाचा पेरा विदर्भात जास्त असताना, संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणात सरकी, जवस आणि शेंगदाणा खाद्यतेलाचा वापर होत असे; मात्र अलिकडे विदर्भवासींनी सोयाबीन आणि इतर खाद्यतेलास प्राधान्य दिले आहे; मात्र गुजरातच्या नागरिकांनी अद्याप सरकी तेलाचा वापर सुरू ठेवला आहे.
-वसंत बाछुका, उद्योजक अकोला.