लोकमत सखी मंचच्यावतीने नवनिर्वाचित नगरसेविकांचा गौरव
By admin | Published: March 9, 2017 03:36 AM2017-03-09T03:36:23+5:302017-03-09T03:36:23+5:30
महिला दिनाचे औचित्य; शहर विकासासाठी सकारात्मक राहण्याचे आयुक्तांनी केले आवाहन.
अकोला, दि. ८- बदलत्या काळात महिलांनी आपल्यामधील क्षमता अधिकाधिक व्यापक करीत नवनवीन आव्हानांचा सामना केला, नव्या विचारांचा अंगीकार करीत, नेतृत्व विकासाच्या संधीचे सोनं करीत अनेक महिलांनी निर्णय प्रकियेत आपला सहभाग वाढवून नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत. महिलांच्या याच कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी लोकमत सखी मंचने अकोला महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या महिला उमेदवारांचा जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर सन्मान केला. स्थानिक प्रमिलाताई ओक हॉलमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त अजय लहाने यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या सोहळय़ाला ह्यलोकमतह्णचे निवासी संपादक रवी टाले, सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजयबाबूजी दर्डा यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या सोहळय़ाला प्रारंभ झाला. यावेळी बोलताना आयुक्त अजय लहाने यांनी अकोला शहराच्या विकासाच्या विविध संकल्पना मांडत महिलांचे निर्णय प्रक्रियेतील योगदान या संदर्भात विवेचन केले.
शहराच्या विकासाची सूत्रे ज्या नगरसेवकांच्या हाती आहेत, त्यामध्ये तब्बल ४१ नगरसेविका या महिला आहेत. त्यामुळे महिलांनी शहर विकासाच्या मुद्यावर सकारात्मक पुढाकार घेऊन महापालिकेच्या कामकाजामध्ये आपला ठसा उमटवावा, असे आवाहन त्यांनी केले. विकासासाठी आलेला निधी हा त्यासाठीच खर्च झाला पाहिजे, त्याचा अपव्यय होत असेल तर विरोध करा, सभागृहात चर्चा होताना वाद होतात; मात्र या वादंगाचा दर्जा असावा, तुमचा मुद्दा हा लोकहितकारी असावा, अशा शब्दात आयुक्त लहाने यांनी महापालिकेच्या कामाची ओळखच करून दिली. महिला दिनाच्या निमित्ताने ह्यलोकमतह्णने हा सोहळा आयोजित करून नारी शक्तीचा सन्मान केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाचे संचालन लोकमतचे मुख्य उपसंपादक राजेश शेगोकार यांनी केले.
कार्यक्रमामध्ये माजी महापौर तथा नगरसेविका सुमनताई गावंडे, ज्येष्ठ नगरसेविका उषाताई विरक, मंजूषा शेळके, सुनीता अग्रवाल, गीतांजली शेगोकार, माधुरी मेश्राम, सुजाता अहीर, धनश्री देव, योगीता पावसाळे, वैशाली शेळके, सारिका जयस्वाल, माधुरी बडोणे, शाहीन अंजूम महेबुब खान, जैनबबी शे. इब्राहीम, चांदनी शिंदे, अजरा नसरीन मकसूद खान, अर्चना मसने, रश्मी अवचार, आरती घोगलिया, नंदाताई पाटील, रंजना विंचनकर, शीतल गायकवाड, जान्हवी डोंगरे, किरण बोराखडे, दीपाली जगताप, शारदा खेडकर, मनीषा भंसाली, आम्रपाली उपर्वट, सोनी आहुजा, प्रमिला गीते, अनिता मिश्रा, सपना नवले, जयश्री दुबे, शारदा ढोरे या ३४ नगरसेविकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.