प्राथमिक व माध्यमिक शाळांची संचमान्यता स्थगित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 04:27 PM2019-09-22T16:27:10+5:302019-09-22T16:27:14+5:30
राज्य शासनाने यंदा २0१९-२0 ची प्राथमिक व माध्यमिक शाळांची संचमान्यता स्थगित केली आहे.
अकोला: राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या भरमसाट वाढत आहे. या शिक्षकांचे समायोजन होत नसल्यामुळे शिक्षण विभागासमोर अडचणी वाढत आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून संधी द्यावी, यासाठी राज्य शासनाने यंदा २0१९-२0 ची प्राथमिक व माध्यमिक शाळांची संचमान्यता स्थगित केली आहे.
गत तीन-चार वर्षांपासून जिल्हा परिषद, नगर परिषद आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पटसंख्या झपाट्याने घसरत आहे. पटसंख्येअभावी शाळांमधील शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत वाढ होत आहे. रिक्त जागा कमी आणि अतिरिक्त शिक्षक जास्त अशी परिस्थिती सर्वच जिल्ह्यांमध्ये उद्भवली आहे. यातून मार्ग कसा काढावा, यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग विचार करीत होता. यासंदर्भात शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत फेब्रुवारी २0१९ मध्ये बैठक झाली होती. या बैठकीत ठरल्यानुसार संचमान्यता, अतिरिक्त शिक्षकांच्या बाबतीत सल्लागार समितीने निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु त्याबाबत निर्णय न घेतला नाही. वाढती अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येला आळा घालावा आणि शिक्षणसंस्था चालकांना शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याची संधी द्यावी. यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होण्यापासून वाचतील आणि त्यांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होणार नाही. या उद्देशाने राज्य शासनाने २0१९-२0 या वर्षाची संचमान्यता स्थगित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)