पंतप्रधान म्हणाले; मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा प्रयत्न देशासाठी प्रेरक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 08:55 PM2018-01-28T20:55:57+5:302018-01-29T02:07:55+5:30
अकोला : जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व शहरातील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, कर्मचारी संघटनांसह लोकसहभागातून गत १३ जानेवारीपासून राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. या अभियानाची ‘मन की बात’मध्ये दखल घेताना पंतप्रधानांनी मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा अकोलेकरांचा प्रयत्न देशासाठी प्रेरक असल्याचे गौरवोद्गार काढले. पंतप्रधानांनी घेतलेली ही नोंद अभियानाला मोठे बळ देणारी ठरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व शहरातील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, कर्मचारी संघटनांसह लोकसहभागातून गत १३ जानेवारीपासून राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. या अभियानाची ‘मन की बात’मध्ये दखल घेताना पंतप्रधानांनी मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा अकोलेकरांचा प्रयत्न देशासाठी प्रेरक असल्याचे गौरवोद्गार काढले. पंतप्रधानांनी घेतलेली ही नोंद अभियानाला मोठे बळ देणारी ठरली आहे.
१३ जानेवारी रोजी मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर दुसर्या टप्प्यात २0 जानेवारी रोजी राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिसर्या टप्प्यात शनिवार, २७ जानेवारी रोजी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा स्वच्छता मिशन’ला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्णा नदी स्वच्छतेच्या या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप येत असल्याचा प्रत्यय देणारे चित्र मोर्णा काठी पाहावयास मिळाले. या सर्व प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत अभियानात सहभागी सर्वांचे कौतुक केले.
पंतप्रधान म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंगेशने नरेंद्र मोदी अँपवर पाठविलेल्या फोटोकडे माझे लक्ष वेधल्या गेले. त्या फोटोमध्ये एक नातू आपल्या आजोबांसोबत मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेला दिसत होता. नंतर मला कळले, की अकोल्याचे नागरिक स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबवित आहेत. पूर्वी मोर्णा नदी बाराही महिने वाहत होती; परंतु आता जलकुंभी व कचर्याने ती भरलेली होती. तिच्या स्वच्छतेसाठी अँक्शन प्लॅन तयार करण्यात आला. १३ जानेवारी रोजी मोर्णा स्वच्छता मोहिमेतंर्गत नदीच्या चार किलोमीटर क्षेत्रात चौदा ठिकाणांवरून लोकसहभागातून नदीची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात सहा हजारांपेक्षा जास्त नागरिक, शंभरापेक्षा जास्त सामाजिक संस्था, विद्यार्थी, मुले, वृद्धांसह प्रत्येकाने भाग घेतला. २0 जानेवारीलाही नदी स्वच्छतेची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. मला सांगण्यात आले, की नदी पूर्णपणे स्वच्छ होईपयर्ंत दर शनिवारी ही मोहीम सुरूच राहणार आहे. मोर्णा स्वच्छता मोहिमेची दखल पंतप्रधानांनी घेतल्यामुळे अकोलेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, यांच्यासह लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, एनएनसी, व्यापारी, नागरिकांनी मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
‘मन की बात’मध्ये अकोला तिसर्यांदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशभरातील जनतेसोबत संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केल्यापासून आतापर्यंत तीन वेळा अकोल्याची नोंद त्यांनी घेतली. अमोल सावंत यांच्या ‘निसर्ग कट्टा’ने राबविलेल्या पर्यावरणपुरक गणपतीची निर्मिती, नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांसाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करून देणारे मुरलीधर राऊत व संदीप पाटील यांच्या कार्याचीही नोंद पंतप्रधानांनी घेतली होती व आता मोर्णा नदी स्वच्छता अभियानाची दखल घेतली आहे.
एकदा ठरवलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. जन आंदोलनाच्या माध्यमातून मोठय़ात - मोठा बदल होऊ शकतो. मी अकोल्याच्या जनतेला, तेथील जिल्हा व महापालिका प्रशासनाला, मोर्णा नदी स्वच्छता अभियानाला जन आंदोलन करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व नागरिकांच्या प्रयत्नांना शुभेच्छा देतो. अकोल्याचा हा प्रयत्न देशातील इतर नागरिकांनाही प्रेरित करेल.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मोर्णा नदी स्वच्छता अभियानाची दखल पंतप्रधानांनी घेतली. हे सर्व अकोलेकरांच्या परिश्रमातून शक्य झाले आहे. आपल्या शहराची सकारात्मक ओळख यानिमित्ताने देशाला झाली आहे. सर्वांच्या प्रयत्नातून मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचे काम पूर्णत्वास नेऊ, असा विश्वास यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी
Mann Ki Baat :
https://www.youtube.com/watch?v=WNuyjrRUBk8