शालेय पोषण आहाराच्या नव्या आदेशाला मुख्याध्यापकांचा विरोध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 01:44 PM2019-08-10T13:44:06+5:302019-08-10T13:44:12+5:30
शाळांमध्ये नाचणी, बाजरीची भाकरी विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने साहित्य उपलब्ध करून दिलेले नाहीत.
अकोला: राज्य शासनाने नव्याने शालेय पोषण आहारामध्ये खिचडीसोबतच नाचणी, बाजरीची भाकरी उपलब्ध करून देण्याविषयी आदेश काढला आहे. या आदेशाला राज्यभरातील मुख्याध्यापकांनी विरोध दर्शविला आहे. शाळांमध्ये नाचणी, बाजरीची भाकरी विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने साहित्य उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाचणी, बाजरीची भाकरी कशी उपलब्ध करावी, स्वयंपाकी कोठून आणावा, असा प्रश्न उपस्थित केला आहे. शासनाने हा आदेश मागे घ्यावा, अन्यथा विदर्भ मुख्याध्यापक संघाच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी दिला आहे.
विदर्भ मुख्याध्यापक संघाची राज्यस्तरीय बैठक नुकतीच यवतमाळ येथे पार पडली. या बैठकीमध्ये शालेय पोषण आहारात समावेश करण्यात आलेल्या नाचणी, बाजरीची भाकरी उपलब्ध करून देण्यासोबतच इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली. शासनाने हा आदेश तातडीने मागे घ्यावा, या आदेशामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरसुद्धा परिणाम होण्याची शक्यता मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. शासनाने विद्यार्थ्यांना नाचणी, बाजरीची भाकर उपलब्ध करून देण्याचा आदेश काढला; परंतु भाकरी कशी उपलब्ध करून द्यावी, त्यासाठी साहित्य शासनाने उपलब्ध केले नाही. स्वयंपाकी उपलब्ध करावा तर त्याचे वेतन कोण देणार, त्यासाठी लागणारी भांडी, धान्य अद्याप दिले नाही. त्यामुळे अंमलबजावणी कशी करणार, असे प्रश्न मुख्याध्यापकांनी विदर्भ मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत उपस्थित केले आहेत. यासोबतच बैठकीत शासनाने नव्याने शैक्षणिक धोरण विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, तसेच तुकड्यांना अनुदान, समायोजन सुरू करून गणित, इंग्रजी, विज्ञानसारख्या शाळांना जागा उपलब्ध करून देणे, संचमान्यता दुरुस्त करणे, जि.प. प्राथमिक शाळांना वर्ग ५ ते ८ जोडण्याला विरोध आदी ठराव बैठकीत मंजूर करण्यात आले. बैठकीला विदर्भ सचिव सतीश जगताप, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारोती खेडेकर, दीपक दोंदल, कार्याध्यक्ष अशोक पारधी, विलास भारसाकडे, रामप्रसाद धावडे, मंदा उमाठे, विनोद संगीतराव, दिनेश तायडे, बळीराम झामरे, रजिया बेग, प्रकाश बुमकाळे यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. (प्रतिनिधी)