महाकाली हॉटेलवर छापा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:36 AM2017-08-17T01:36:12+5:302017-08-17T01:36:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तसेच पूर्वीच्या महाकाली वाइन बार व आताच्या महाकाली हॉटेलवर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी रात्री छापा टाकला. यावेळी अवैधरीत्या विक्री करण्यात येत असलेली ११ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून, हॉटेलच्या दोन्ही संचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
राजकीय पदाधिकार्यांचे राजाश्रय असलेल्या महाकाली हॉटेलमधून देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचून दारूचा साठा असल्याचे निश्चित होताच छापा टाकला. यामध्ये विदेशी दारू जप्त करण्यात आली असून, ही दारू तब्बल ११ हजार रुपयांची असल्याची माहिती आहे. यावेळी महाकाली हॉटेलचे संचालक सचिन अशोकसिंह रघुवंशी व महेंद्रसिंह अशोकसिंह रघुवंशी रा. तोष्णीवाल ले-आउट या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी केली.
पोलीस मुख्यालयासमोरील जुगारावर छापा
पोलीस मुख्यालयासमोरील कमला नेहरुनगरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी छापा टाकून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
येथून जुने शहरातील रहिवासी जगदीश मानमोडे, हिंगणा फाटा येथील रहिवासी नाजुकराव अहीर, भौरद येथील कैलास मारोती सोनोने, तारफैलमधील बबलू गोमाजी डोंगरे, हरिहरपेठेतील अनिल गायकवाड व कैलास टेकडी येथील रहिवासी अशोक शाहू या सहा जणांना अटक केली. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आठ दिवसांमध्ये या ठिकाणच्या जुगार अड्डय़ावर ही दुसरी कारवाई आहे.