मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेपुर्वी मनोज तायडे, कृष्णा अंधारे स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 03:08 PM2019-08-06T15:08:54+5:302019-08-06T15:09:01+5:30
मनोज तायडे व कृष्णा अंधारे या दोन नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी सायंकाळी अकोल्यात येणार असल्याच्या पृष्ठभूमीवर शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे व कृष्णा अंधारे या दोन नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी या दोन्ही नेत्यांना त्यांच्या घरून ताब्यात घेतले असून, सद्या त्यांना रामदास पेठ पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी सायंकाळी अकोल्यात येणार असून, सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस खबरदारी घेत आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेत कमी मोबदला मिळाला म्हणून वाढीव मोबदल्याची मागणी करीत बाळापूर तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या पृष्ठभूमीवर शेतकरी नेते आक्रमक झाले असून, महाजनादेशयात्रेनिमित्त अकोल्यात येणार असलेल्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचे नियोजन शेतकरी जागर मंचाकडून करण्यात आले होते. याची कुणकुण लागताच रामदासपेठ पोलिसांनी मंगळवारी सकाळीच मनोज तायडे व कृष्णा अंधारे या दोघांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. दरम्यान, ही प्रतिबंधात्मक कारवाई असून, कोणतीही दडपशाही करण्यात येत नसल्याचे पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांनी सांगितले.