‘जीएमसी’वरील भार कमी करण्यास प्राधान्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 02:11 PM2019-11-29T14:11:18+5:302019-11-29T14:11:24+5:30
सुपर स्पेशालिटी आणि स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीत रुग्णसेवा सुरू झाल्यानंतर सर्वोपचारमधील सेवेत सुधारणा होईल, असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर असले तरी, औषधांचा तुटवडा, यंत्रसामग्रीतील तांत्रिक बिघाड आणि जीर्ण इमारतींमुळे रुग्णसेवा नेहमीच प्रभावित होते. शिवाय, ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण उपचारासाठी येथेच येत असल्याने सर्वोपचार रुग्णालयावरील रुग्णसेवेचा भार वाढला आहे. रुग्णसेवेचा हा भार कमी करण्यास प्राधान्य देण्यात येत असून, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुविधा आणखी बळकट करण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
हृदयरोग बालकांसाठी टू डी ईको तपासणी शिबिर तसेच अपघातात जखमी नाशिक येथील खेळाडूंना भेट देण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिली. सर्वोपचार रुग्णालयात दररोज अकोला जिल्ह्यासह बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने येतात; मात्र येथील अनेक वैद्यकीय उपकरणे नादुरुस्त असून, रिक्त पदांचीही समस्या आहे. अशातच ग्रामीण भागातील रुग्ण लहान-मोठ्या आजारांच्या उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयातच येतात. त्यामुळे येथील डॉक्टरांवर रुग्णसेवेचा भार वाढला आहे. तसेच रुग्णालयाच्या जुन्या इमारतीही धोकादायक ठरत आहेत. एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करीत सर्वोपचार रुग्णालयावरील भार कमी करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच तांत्रिक बाबींची पूर्तता करून सुपर स्पेशालिटी आणि स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीत रुग्णसेवा सुरू झाल्यानंतर सर्वोपचारमधील सेवेत सुधारणा होईल, असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला.