महिलेची खरेदी-विक्री करणारे कारागृहात
By admin | Published: March 2, 2016 02:47 AM2016-03-02T02:47:51+5:302016-03-02T02:47:51+5:30
पाच जणांसह महिलेचा समावेश.
अकोला: हरिहरपेठेतील रहिवासी असलेल्या एका महिलेस गुंगीचे औषध देऊन तिची गुजरातमध्ये खरेदी-विक्री करणारे गुजरातमधील पाच जण तसेच अकोल्यातील एका महिलेची न्यायालयाने मंगळवारी कारागृहात रवानगी केली. या सहा आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
हरिहरपेठ येथील रहिवासी संगीता सुधाकर तायडे या महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. ती मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवते. तिच्या शेजारी साजिदा परवीन शकील अहमद ही महिला राहते. तिने संगीताला विवाह करण्यासाठी वारंवार म्हटले; मात्र तिने विरोध केला. त्यानंतर साजिदा परवीन हिच्या घरी काही पाहुणे आल्याच्या बहाण्याने संगीताला घरी बोलावले. त्यानंतर गुलकंद व चहामध्ये गुंगीचे औषध देऊन तिची गुजरातमध्ये विक्रीचा व्यवहार पक्का केला. संगीताला गुजरातमध्ये नेण्यात येत असताना नंदुरबारनजीक नवापूर येथे अचानक जाग आल्याने तिने आरडाओरड केली. या प्रकाराची माहिती नंदुरबार जीआरपीला मिळताच त्यांनी संगीताची सुटका केली तसेच गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील रहिवासी भरतभाई कादीरभाई परमार, अशोकभाई वालजीभाई सोलंकी, शंकरभाई रामजीभाई परमार, शेख मोहम्मद खालीद अशपाकउर रहमान, वाहिद दिवान हैदर शाह यांना अटक केली. या आरोपींना जुने शहर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. जुने शहर पोलिसांनी हरिहरपेठेतील रहिवासी साजिदा परवीन शकील अहमद हिलादेखील अटक केली. या सहा आरोपींना न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी पोलीस कोठडी संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली.