खासगी बसची प्रवासी वाहनास धडक; तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:35 PM2019-12-08T18:35:39+5:302019-12-08T18:35:55+5:30
भरधाव खासगी बसने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनास धडक दिल्याची घटना वाडेगाव ते बाळापूर रस्त्यावरील धनेगाव फाट्यावर घडली.
वाडेगाव : भरधाव खासगी बसने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनास धडक दिल्याची घटना वाडेगाव ते बाळापूर रस्त्यावरील धनेगाव फाट्यावर घडली. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले आहेत.
वाडेगाव येथून प्रवासी घेऊन एमएच २८ एच १०८४ क्रमांकाचे वाहन बाळापूरकडे जात होते. दरम्यान, धनेगाव फाट्यावर प्रवासी घेण्याकरिता काळी-पिवळी थांबली होती. यावेळी या रस्त्याने येत असलेल्या खासगी बस क्र. एमएच ३४ बीजी ५९५८ ने काळी-पिवळीला जबर धडक दिली. या अपघातात वाडेगाव येथील पांडुरंग राजाराम रत्नपारखी (८०), प्रथमेश रत्नपारखी (१४), वैशाली संतोष मानकर (३६) आदी प्रवासी जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच धनेगाव येथील सामाजिक युवा कार्यकर्ते नीलेश कळसने, वाडेगावचे विकी जंजाळ, शरद लांडे, चंद्रशेखर इंगळे, बंटी जंजाळ व गोपाळ लांडे यांनी जखमींना मदत केली. सर्व जखमींना वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. डॉ. शुभांगी घुगे यांनी जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविले. वाडेगाव चौकीच्या पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास वाडेगाव पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)