तलाठय़ांच्या मदतीला खासगी कर्मचारी
By admin | Published: January 24, 2017 02:31 AM2017-01-24T02:31:14+5:302017-01-24T02:31:14+5:30
शासनाच्या परिपत्रकाला तलाठय़ांचा खो
अकोला, दि. २३- शासनाने परिपत्रक काढून तलाठय़ांना मुख्यालयी राहण्याचा तसेच खासगी व्यक्ती कामावर न ठेवण्याचे आदेश दिले आहेत; मात्र अकोला जिल्ह्यातील नऊ तलाठय़ांनी शासनाच्या आदेशाला खो दिल्याचे २३ जानेवारी लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. लोकमतच्या विविध प्रतिनिधींनी एकाच वेळी सातही तालुक्यातील २८ गावांमध्ये स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तेल्हारा शहरातील दोन, अडगाव बु, चतारी, आलेगाव, जनुना, देगाव, विवरा, पिंपळखुटा, चतारी आदी गावातील कार्यालयात खासगी व्यक्ती ठेवलेल्या असल्याचे आढळले. तसेच आठवड्याचा पहिला दिवस असूनही वाडेगाव, पिंपळखुटा, चतारी, चान्नी, आलेगाव, पिंजर, जनुना, हातरुण, दिग्रस व देगाव येथील तलाठी कार्यालये बंद आढळली. तसेच चान्नी, सस्ती व आलेगाव येथील मंडळ कार्यालयेही बंद आढळली. तलाठी दौर्यावर अथवा रजेवर असतील तर कार्यालयाजवळ तशा प्रकारचे फलक लावणे शासनाने अनिवार्य केलेले आहे; मात्र तसे कुठलेही फलक या बंद असलेल्या कार्यालयाजवळ आढळले नाही. जिल्ह्यातील तब्बल नऊ कार्यालये बंद आढळली. तसेच धाबा येथील तीन, हिवरखेड व कुरूम येथील प्रत्येकी दोन व चतारी, हातरुण, चान्नी, बहीरखेड, वाडेगाव, मळसूर, आलेगाव, सिरसोली, पिंजर येथील प्रत्येकी एक अशा १७ तलाठय़ांनी दांडी मारल्याचे समोर आले. गैहजर तलाठय़ांविषयी विचारणा केल्यास तहसीलमध्ये दौर्यावर गेल्याचे सांगण्यात येते. पातूर तालुक्यातील शिर्ला, बाळापूर तालुक्यातील अंदुरा, अकोट तालुक्यातील वरुर जउळका, मुंडगाव, चोहोट्टा बाजार व अकोला तालुक्यातील वणीरंभापूर व बोरगावमंजू येथे नियमानुसार काम सुरू असल्याचे आढळले.