तांत्रिक अडचणी समोर करून खासगी रुग्णालयांचा जनआरोग्य योजनेतून काढता पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 03:16 PM2019-02-23T15:16:54+5:302019-02-23T15:16:59+5:30
अकोला: खासगी रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना प्रत्यक्षात राबविताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक रुग्णालये या योजनेतून काढता पाय घेत असल्याची माहिती आहे. परिणामी, गरीब रुग्णांसाठी उपचार महागडा ठरत आहेत.
अकोला: खासगी रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना प्रत्यक्षात राबविताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक रुग्णालये या योजनेतून काढता पाय घेत असल्याची माहिती आहे. परिणामी, गरीब रुग्णांसाठी उपचार महागडा ठरत आहेत.
महात्मा जोतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजना गोरगरिबांसाठी संजीवनी ठरत आहे. योजनेंतर्गत अनेकांना खासगी रुग्णालयात उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळत आहेत; परंतु योजना राबविताना काही वैयक्तिक तर काही तांत्रिक अडचणींना समोर करून खासगी रुग्णालये योजनेतून काढता पाय घेत असल्याची माहिती आहे. जीवनदायी योजना राबविण्यासंदर्भात खासगी रुग्णालयांनी काही मागण्या लावून धरल्या आहेत. समस्या सोडविण्यासाठी खासगी केंद्रांनी राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे मागणी केली असून, यामध्ये प्रामुख्याने मान्यता प्राप्त खासगी रुग्णालयात खाटांची संख्या २५ ठेवण्यात यावी, तक्रारींसंबंधी रुग्णालय डॉक्टर, कर्मचारी यांच्यामार्फत शहानिशा व्हावी, त्यानंतरच तक्रारीचे स्वरूप देण्यात यावे, जास्त आजार असतात, असा रुग्ण असल्यास इतर आजारांच्या उपचारासाठी योजनेंतर्गत पॅकेज मंजूर होत नाही. पॅकेजमध्ये सर्व उपचार करण्याची सक्ती केली जाते. ‘ईटीआय’ घेतल्यानंतर जर रुग्णाने ७२ तासांच्या आत आवश्यक कागदपत्रे आणून दिली नाहीत, तर रुग्णाचे शुल्क जमा करण्याची जबाबदारी सोसायटीने घ्यावी, अनेक वेळा क्षुल्लक कारणांमुळे क्लेम रिजेक्ट केला जातो, अशा ‘क्लेम’ला मान्यता द्यावी, तांत्रिक त्रुटींसाठी अॅप्रुवल पेन्डिंग ठेवले जाते. त्रुटी तत्काळ सांगण्यात यावी, तीन दिवसांनंतर क्लेम नाकारला गेला, तर रुग्णांकडून शुल्काची मागणी त्रासदायक ठरते. रुग्णाला सुटी झाल्यानंतरही नातेवाईक घेऊन जात नाहीत. यासंबंधी मार्गदर्शन व्हावे, रुग्ण निर्धारित कालावधीत बरा न झाल्यास नवीन पॅकेज उपलब्ध करून द्यावे, योजना लागू झाल्यापासून पॅकेज रकमेत वाढ झाली नसल्याने रकमेत वाढ करण्यात यावी, यासह इतर अडचणींचा समावेश आहे.
वैयक्तिक समस्यांचा त्रास रुग्णांना
योजना राबविताना अनेक खासगी रुग्णालयांच्या काही वैयक्तिक समस्या असतात. या समस्या समोर करूनही रुग्णांना उपचार देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची माहिती आहे. या धोरणाचा त्रास मात्र रुग्णांना सोसावा लागतो.
यासंदर्भात जिल्हा स्तरावर बैठक झाली आहे. जिल्ह्यातील ११ रुग्णालयांमध्ये जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- सुनील वाठोरे, जिल्हा समन्वयक, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, अकोला.