रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने खासगी लाइनमनचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:33 AM2020-07-21T10:33:23+5:302020-07-21T10:33:37+5:30
खासगी लाइनमन भूषण भुजंगराव देशमुख (३0 रा. भेंडी महाल) यांना विजेचा जबर धक्का बसला.
निहिदा : निहिदा गावापासून जवळ असलेल्या घाटटेक ते वडाळा रस्त्यावर विद्युत रोहित्रावर सोमवारी दुपारी काम करीत असताना, खासगी लाइनमन भूषण भुजंगराव देशमुख (३0 रा. भेंडी महाल) यांना विजेचा जबर धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
भूषण देशमुख सोमवारी दुपारी घाटटेक ते वडाळा रस्त्यावरील गोपनारायण यांच्या शेताजवळील विद्युत रोहित्रावर काम करीत असताना, त्यांना अचानक विजेचा जबर धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. महावितरणचे लाइनमन स्वत: विद्युत खांब, विद्युत रोहित्रावर काम करीत नाहीत. त्यासाठी खासगी इलेक्ट्रिशिनकडून ते कामे करून घेतात. महवितरणच्या बिट लाइनमननेच भूषण देशमुख यांना विद्युत रोहित्राचे काम दिले होते, अशी चर्चा आहे. महावितरणचे पिंजर येथील कनिष्ठ अभियंता मंगेश प्रभाकर राणे यांनी पिंजर पोलिसात भूषण देशमुख विनापरवानगी विद्युत रोहित्रावर कमी करीत होते, अशी तक्रार दिली. त्यामुळे भूषण देशमुखचे नातेवाईक संतप्त झाले होते. नातेवाइकांनी बिट लाइनमनविरुद्ध कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची भूमिका घेतली होती. पिंजरचे ठाणेदार राजू भारसाकडे यांनी नातेवाइकांची समजूत काढली आणि तक्रार द्या, पोलीस कारवाई करतील, असे सांगितले. त्यामुळे नातेवाइकांनी मृतदेह उचलण्यास परवानगी दिली.