शासकीय डॉक्टरांची नियमबाह्य खासगी प्रॅक्टिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:20 PM2019-03-26T13:20:57+5:302019-03-26T13:21:16+5:30

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांची नियमांना डावलून बेधडक खासगी प्रॅक्टिस सुरू आहे. हा नियमबाह्य प्रकार वरिष्ठांना ज्ञात असूनही त्यावर पडदा टाकण्यात येत आहे.

Private Practice of Government Doctors in Akola | शासकीय डॉक्टरांची नियमबाह्य खासगी प्रॅक्टिस

शासकीय डॉक्टरांची नियमबाह्य खासगी प्रॅक्टिस

Next

- प्रवीण खेते
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांची नियमांना डावलून बेधडक खासगी प्रॅक्टिस सुरू आहे. हा नियमबाह्य प्रकार वरिष्ठांना ज्ञात असूनही त्यावर पडदा टाकण्यात येत आहे. याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर पडत असून, डॉक्टरच उपलब्ध नसल्याची ओरड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून होते.
नियमानुसार शासकीय सेवेत कार्यरत डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करता येत नाही. सेवेत रुजू होण्यापूर्वी तसे बॉन्ड पेपरवर लिहूनही घेण्यात येते; मात्र हे नियम केवळ कागदोपत्रीच ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२० नियमित, १०० च्यावर ज्युनिअर रेसिडेन्स डॉक्टर, तर ३० च्या जवळपास बंधपत्रित डॉक्टर व प्राध्यापक कार्यरत आहेत. यातील ३० ते ४० प्राध्यापक डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांची नियमबाह्य खासगी प्रॅक्टिस सुरू आहे. या डॉक्टरांचे स्वत:चे दवाखाने आहेत. शिवाय, शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयाच्या यादीतही त्या डॉक्टरांच्या नावाचा समावेश आहे. हा प्रकार उघडपणे सुरू असला, तरी कोणी तक्रार करत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करता येत नसल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात येते; परंतु डॉक्टरांचा हा प्रकार थेट रुग्णसेवेला प्रभावित करत आहे. खासगी प्रॅक्टिसमध्ये व्यस्त असणाऱ्या डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांवर उपचार होत नाही. हा प्रकार अनेकांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे.

या विभागातील डॉक्टरांचा समावेश
अस्थितरोग तज्ज्ञ
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र
कान-नाक-घसा
सर्जरी
मेडीसीन
दंतरोग

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हाती कारभार
खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचा बहुतांश वेळ खासगी रुग्णालये किंवा स्वत:च्या दवाखान्यात जातो. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेचा भार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर येत आहे. हा प्रकार रुग्णांच्या जीवावर बेतणारा आहे.

रुग्ण रेफर टू खासगी रुग्णालय
सर्वोपचार रुग्णालयात सुविधांचा अभाव आणि अस्वच्छता असल्याचे रुग्णांना सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णाला खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्लाही या ठिकाणी काही डॉक्टर देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शासकीय सेवेत कार्यरत कुठल्याच डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करता येत नाही; परंतु खासगी प्रॅक्टिसप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन ते चार डॉक्टरांनी न्यायालयातून स्टे आणला आहे, त्यामुळे त्यांची खासगी प्रॅक्टिस सुरू आहे; मात्र इतर डॉक्टरांवर शिस्तभंगाची कार्यवाही होऊ शकते. परंतु तशी तक्रार आमच्यापर्यंत आली नाही.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

 

Web Title: Private Practice of Government Doctors in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.