जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात खासगी वाहनधारकांची अरेरावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 02:06 PM2020-01-10T14:06:38+5:302020-01-10T14:06:46+5:30
जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर खासगी वाहने उभी करून गर्भवतींचे नातेवाईक म्हणून हे वाहनधारक रुग्णालयात प्रवेश करतात.
अकोला : जननी शिशु सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णवाहिका कार्यरत असतानाही परिसरात दलालांच्या सहकार्याने खासगी वाहनधारकांकडून अरेरावी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. खासगी वाहनधारकांकडून शासकीय रुग्णवाहिकेच्या चालकांना मारण्याची धमकी मिळाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी गुरुवारी रामदासपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली.
जननी शिशु सुरक्षा योजनेंतर्गत शासकीय वाहनानेंच नवजात शिशुसह मातेला घरपोच पोहोचविण्यात येते; परंतु जिल्हा स्त्री रुग्णालयात काही दलालांच्या सहकार्याने खासगी वाहनधारकांकडून गर्भवतींसह नातेवाइकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर खासगी वाहने उभी करून गर्भवतींचे नातेवाईक म्हणून हे वाहनधारक रुग्णालयात प्रवेश करतात. या ठिकाणी ते दलालांच्या मदतीने गर्भवती व त्यांच्या नातेवाइकांची दिशाभूल करत त्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे.
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शासकीय रुग्णवाहिकेच्या चालकांनी खासगी वाहनधारकांना रोखले असता, त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी शासकीय रुग्णवाहिकाचालकांनी गुरुवारी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेत त्यांना झालेल्या प्रकारासंदर्भात माहिती दिली. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी खासगी वाहनधारकांविरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
जिल्हा स्त्री रुग्णालयातही दलाल सक्रिय
सर्वोपचार रुग्णालयासोबतच जिल्हा स्त्री रुग्णालयातही दलाल सक्रिय असल्याचे या निमित्ताने समोर आले; परंतु त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याचेही वास्तव आहे.
या वाहनांवर कारवाईची मागणी
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात एमएच-३० ए.एफ.१७८, एमएच ३० ए.ए.-३१७०, एमएच-२८ व्ही.२९९५, एमएच-३० ए.झेड.७४०९, एमएच-३० ए.एफ.२८०६, एमएच -३० ए.टी.१७४५ या क्रमांकाचे वाहने दिसताच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्हा स्त्री रुग्णालयात दलालांसोबतच खासगी वाहनधारकांकडून अरेरावी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामदासपेठ रुग्णालयात तक्रार दिली असून, कारवाईची अपेक्षा आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.