कपाशी पिकावर यावर्षीही संक्रांत; ३० ते ४० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:25 PM2019-10-07T12:25:17+5:302019-10-07T12:25:26+5:30
सतत पाऊस, रोगराई व ढगाळ वातावरणाचा फटका बसल्याने ३० ते ४० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कपाशी पिकाला गत काही वर्षांपासून ग्रहण लागले असून, यावर्षीही नेमके वाढ व फुले, पात्या येण्याच्या अवस्थेत सतत पाऊस, रोगराई व ढगाळ वातावरणाचा फटका बसल्याने ३० ते ४० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
विदर्भात १७ लाख हेक्टवर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी ७० हजार हेक्टरने हे क्षेत्र वाढले आहे. तथापि, या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाला विलंब झाल्याने पेरणीला उशीर झाला.
त्यानंतर आलेल्या अल्पशा पावसात शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु हा पाऊस सतत सुरू आहे. ढगाळ वातावरणही असल्याने पिकावर रोगराई वाढली. शेत तणाने व्यापल्याने पिकांचे नियंत्रण करता आले नाही. हे सर्व ४५ ते ६५ दिवस कपाशी पिकाची वाढ, फुले व पात्या झाडाला धरण्याच्या अवस्थेत झाल्याने कपाशीवर प्रतिकूल परिणाम झाला.
सततच्या पावसामुळे शेतात बुरशी निर्माण झाली. झाडांच्या मुळांना अन्नद्रव्याचा पुरवठा बंद पडल्याने कपाशीची बोंडे सडली. काही ठिकाणी काळवंडली आहेत. भारी, काळ्या जमिनीवरील हे पीक पिवळे पडले.
आता पिकांना वापशाची नितांत गरज आहे. ऊन पडले तरच तो मिळेल. अलीकडे तसे दिसत नसल्याने कपाशीचे सर्व पीक हातचे जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कपाशीचे पीक दिवाळीत घरी येते. तथापि, यावर्षी अद्याप हे पीक काही ठिकाणी फुलांवर, तर काही ठिकाणी बोंड्यांच्या अवस्थेत आहे. हा परिणाम देशी कपाशीपेक्षा बीटीवर अधिक दिसून येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कपाशीवरही परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी कपाशीला फुले धरली आहेत.
यावर्षी पाऊस उशिरा आला. त्यानंतर झाडांची वाढ, फुले व पात्या धरण्याच्या ४५ ते ६५ दिवस सतत पाऊस सुरू असल्याने शेतात बुरशी, रोगराई व तण निर्माण झाले. झाडांच्या मुळांना अन्नद्रव्याचा पुरवठा होत नसल्याने पिके पिवळी पडली. क ाही भागात बोंंडे सडली. फुले, पात्या गळाल्या आहेत. परिणामी, यावर्षी ३० ते ४० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
-डॉ. शरदराव निंबाळकर,शेती तज्ज्ञ तथा माजी कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.