शेतकरी अडचणीत; पीक विम्याचा आधारही मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 02:28 PM2018-05-09T14:28:38+5:302018-05-09T14:30:27+5:30
आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा आधार केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- संतोष येलकर
अकोला: खरीप पेरण्या तोंडावर आल्या असताना, गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा रकमेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा आधार केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद इत्यादी पिकांचा शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. विमा हप्त्याची रक्कम (प्रीमियम) नॅशनल इश्युरन्स कंपनीकडे जमा करून, पीक विमा काढण्यात आला. गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना, गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यां ना पीक विमा रकमेचा लाभ अद्याप मिळाला नाही. खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असताना जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार शेतकऱ्यां ना पीक विमा रकमेचा आधार अद्याप मिळाला नसल्याने, पीक विम्याचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
खरीप पेरणी खर्चाची शेतकऱ्यांना चिंता!
गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून पीक विम्याची रक्कम खरीप पेरणीपूर्वी मिळण्याची अपेक्षा केली जात आहे; मात्र खरीप पेरण्या तोंडावर आल्या तरी, पीक विमा रकमेचा लाभ मिळाला नसल्याने, शेती मशागतीसह खरीप पीक पेरणी, बियाणे व खतांचा खर्च भागविणार कसा, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकºयांपैकी किती शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला, याबाबतची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही, तसेच पीक विम्याची रक्कम अद्याप प्राप्त झाली नाही.
- राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी