जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत उद्योजकांनी मांडल्या समस्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:23 AM2021-09-22T04:23:06+5:302021-09-22T04:23:06+5:30
अकोला: जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत उद्योगांना येणाऱ्या विविध समस्या उद्योजकांनी मंगळवारी मांडल्या. त्यानुषंगाने अकोल्यातील महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ ...
अकोला: जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत उद्योगांना येणाऱ्या विविध समस्या उद्योजकांनी मंगळवारी मांडल्या. त्यानुषंगाने अकोल्यातील महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ (एमआयडीसी) मधील समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी संबंधित विभागांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश निकम, सहायक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए.बी. दाबेराव, अपर अधिक्षक अभियंता गणेश महाजन, महावितरणचे कार्यकारी अभियंता अ.की. कराळे, सहायक राज्यकर आयुक्त आ.आर. देशमुख, अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेष मालू, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशिष चंदाणी तसेच विविध विभागाचे अधिकारी व अकोला उद्योग संघटनेचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील उद्योगांना येणाऱ्या विविध समस्या उद्योजकांनी मांडल्या. त्यामध्ये ‘एमआयडीसी’ येथील रस्त्यांची दुरवस्था, पथदिवे व सीसीटीव्ही, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा , अतिक्रमणामुळे होणारे अपघात, कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वैद्यकीय सुविधा यासारख्या समस्या मांडण्यात आल्या. संबंधित समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी संबंधित यंत्रणांना दिले. उद्योजकांचे प्रलंबित असलेले प्रस्ताव प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करुन तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
...................फोटो.............................