२८ गैरहजर शिक्षकांवर विनावेतनाची कारवाई
By admin | Published: April 12, 2017 01:47 AM2017-04-12T01:47:17+5:302017-04-12T01:47:17+5:30
अकोला- शाळेत वेळेवर उपस्थित नसलेल्या २८ शिक्षकांचा तो दिवस विनावेतन करण्याची कारवाई अकोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी केली.
सभापतींच्या भेटीत शाळांचे उघड झाले वास्तव
अकोला: शाळांमध्ये शिक्षक मनमानी पद्धतीने उपस्थित राहतात. शालेय पोषण आहारात प्रचंड गोंधळाच्या बाबी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांच्या प्रत्यक्ष भेटीत उघड झाल्या. त्यामुळे शाळेत वेळेवर उपस्थित नसलेल्या २८ शिक्षकांचा तो दिवस विनावेतन करण्याची कारवाई अकोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी केली.
शिक्षकांना शाळेची नियमित वेळ पाळण्याची अॅलर्जी असल्याची बाब शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी दिलेल्या शाळा भेटीत सोमवारी पुढे आली. बोरगावमंजू येथील मराठी शाळा क्रमांक १,२,३ या शाळांमध्ये सकाळीच सभापती अरबट यांनी भेट दिली. यावेळी उर्दू शाळा क्रमांक १ मध्ये सकाळी ७ वाजता एकही शिक्षक उपस्थित नव्हता. ७.३० वाजेपर्यंत एकूण सात शिक्षक उपस्थित झाले. उर्वरित सहा शिक्षकांचा रजेचा अर्जही नव्हता. जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक तीनमध्ये सर्व शिक्षिका शाळेत उपस्थित नव्हत्या. त्या सर्व शिक्षकांवर कारवाई करण्याचे पत्र शिक्षणाधिकाऱ्याला देण्यात आले. तर एक आणि दोनमध्येही तीच परिस्थिती होती.
त्यामुळे वेळेत गैरहजर असलेल्या सर्व शिक्षकांवर कारवाई करण्याचे पत्र सभापती अरबट यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पवार यांनी २८ शिक्षक-शिक्षिकांवर त्या दिवसाचा पगार न देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षक संघटनांमध्ये खळबळ उडाली आहे.
मुख्याध्यापकांचा खुलासाही दिला नाही
विशेष म्हणजे, भेटीदरम्यान सभापतींच्या भेटीदरम्यानच गटशिक्षणाधिकारी पवार यांनी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर दुसऱ्या दिवशीही कोणाकडूनच खुलासा सादर झाला नव्हता. त्यामुळे त्यांना पदाधिकारी-अधिकाऱ्यांचाही कुठलाच धाक नसल्याचे स्पष्ट होते. बोरगावातील शाळेत आढळलेल्या अनियमितता, त्रुटी इतरत्र कुठेही आढळणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे आदेशही पवार यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहे.