अकोला जिल्ह्यातील २२ शाळांविरुद्ध फौजदारी कारवाई होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 02:18 PM2018-07-29T14:18:03+5:302018-07-29T14:19:22+5:30
जिल्ह्यातील अशा २२ प्राथमिक शाळांविरुद्ध आणि त्यांच्या मुख्याध्यापकांविरुद्ध फौजदार कारवाई करण्यात येणार आहे.
अकोला : राज्यभरामध्ये ३ ते ५ आॅक्टोबर २०११ दरम्यान प्राथमिक शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहिमेदरम्यान अनेक शाळांमध्ये कमी उपस्थिती आढळून आली होती. एवढेच नाही, तर शाळांमध्ये बोगस विद्यार्थी पटावर दाखविल्याचे निदर्शनास आले होते. अकोला जिल्ह्यात सुद्धा वर्गात संख्या दाखविण्यासाठी बोगस विद्यार्थी पटावर दाखविण्यात आले होते. जिल्ह्यातील अशा २२ प्राथमिक शाळांविरुद्ध आणि त्यांच्या मुख्याध्यापकांविरुद्ध फौजदार कारवाई करण्यात येणार आहे. शिक्षण संचालक प्राथमिक यांनी कारवाईचा आदेश शिक्षण विभागाला दिला आहे.
राज्यामध्ये विशेष पटपडताळणी मोहिमेदरम्यान ज्या शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत ५0 टक्केपेक्षा कमी उपस्थिती आढळून आली होती. तसेच अनेक शाळांमध्ये पदे वाचविण्याच्या दृष्टिकोनातून बोगस विद्यार्थी पटावर दाखवून वाढीव तुकडी मागणे, वाढीव तुकड्या दाखवून अतिरिक्त शिक्षकांची पदे मंजूर करून घेण्यात आली होती. तसेच या शाळांनी शासनाच्या शालेय पोषण आहार, गणवेश, लेखन साहित्य, पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्तीचा सुद्धा लाभ घेतला. पटपडताळणी मोहिमेत २० टक्केपेक्षा जास्त अनुपस्थिती असलेल्या शाळांची मान्यता रद्द का करू नये, अशा नोटीस शाळांना बजावण्यात आल्या होत्या. ५० टक्केपेक्षा जास्त अनुपस्थिती असलेल्या शिक्षण संस्था व मुख्याध्यापकाविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून शाळेची मान्यता काढून घेण्याचा आदेश शासनाने २ मे २0१२ रोजी दिला होता. परंतु राज्यातील काही शिक्षण संस्थाचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. परंतु, प्राथमिक शिक्षण संचालकांनी न्यायालयात शपथपत्र सादर केले. उच्च न्यायालयाने संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्याचे शासनाचे अधिकार आहेत. परंतु, केवळ ५० टक्केपेक्षा विद्यार्थी उपस्थिती कमी आहे. या कारणावरून गुन्हा दाखल करू नये, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने शाळांबाबत काही बाबी निदर्शनास आल्याने, आदेशाची पूर्तता करण्यास बजावले. त्यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक करून, खोटी कागदपत्रे बनवून ती खरी असल्याचे भासविल्याने या शाळा, मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी दिला आहे. फौजदारी कारवाई करून त्याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयास सादर करायचा असल्याने, तो शिक्षण संचालनालयास सादर करावा, असेही स्पष्ट केले आहे.
या शाळांवर होणार फौजदारी कारवाई!
सुमेध मराठी प्राथमिक शाळा, डाबकी रोड, मनोहर नाईक प्राथमिक शाळा, व्हीएचबी कॉलनी, गोल्डन किड्स कॉन्व्हेंट मूर्तिजापूर, गजानन महाराज प्राथ. शाळा शिवसेना वसाहत, यशोदीप मराठी प्राथमिक शाळा, पुंडलिक महाराज उच्च प्राथमिक शाळा गुडधी, उज्ज्वल कॉन्व्हेंट बोरगाव मंजू, मौलाना आझाद उर्दू प्राथ. शाळा पोपटखेड, मिशन मराठी प्राथमिक शाळा ख्रिश्चन कॉलनी, सानिया उर्दू प्राथ. शाळा ख्रिश्चन कॉलनी, मनपा उर्दू मुलांची शाळा क्र. १३, मनपा मराठी मुलांची शाळा क्र. ५, मनपा हिंदी कन्या क्र. ४ अकोट फैल, मनपा मराठी मुलांची शाळा क्र. २0 डाबकी रोड, मनपा गुजराती मुलांची शाळा, मु्ख्य डाक कार्यालय, मनपा हिंदी मुलांची शाळा क्र. ५, मनपा हिंदी मुलांची शाळा क्र. ३ डाबकी रोड, मनपा उर्दू मुलांची शाळा क्र. ४ गांधी रोड, जि.प. प्राथ. शाळा शिंगोली, जि.प. उर्दू प्राथ. शाळा बटवाडी, जि.प. उर्दू प्राथ. शाळा कवठा खु.
शिक्षण संचालकांचा आदेश प्राप्त झाला आहे. गटशिक्षणाधिकाºयांना या शाळेत पाठवून अहवाल घेऊ. त्यानुसार जिल्ह्यातील २२ शाळांविरुद्ध फौजदारी करण्यात येईल.
- देवेंद्र अवचार, शिक्षणाधिकारी प्राथमिक