कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून लोकवाट्याची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:17 AM2021-04-16T04:17:41+5:302021-04-16T04:17:41+5:30
अकोला: कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या शेती अवजारे व इतर साहित्य वाटप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांकडून जमा करण्यात आलेली लोकवाट्याची रक्कम ...
अकोला: कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या शेती अवजारे व इतर साहित्य वाटप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांकडून जमा करण्यात आलेली लोकवाट्याची रक्कम कृषी विभागाच्या संबंधित काही कर्मचाऱ्यांकडून संबंधित यंत्रणेकडे जमा करण्यात आली नाही, अशा कर्मचाऱ्यांकडून लोकवाट्याची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया राज्यात कृषी विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.
कृषी विभागामार्फत २०१५ पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांत शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मोटरपंप, पाइप, स्प्रिंकलर संच, तणनाशक, फवारणी यंत्र आदी कृषिपयोगी अवजारे वाटपाची योजना राबविण्यात आली. त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान व इतर शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्यात आले. अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून २५ टक्के व इतर शेतकऱ्यांकडून ५० टक्के लोकवाट्याची रक्कम जमा करण्यात आली होती. परंतु शेतकऱ्यांकडून जमा करण्यात आलेल्या लोकवाट्याची रक्कम कृषी विभागाच्या काही संबंधित कर्मचाऱ्यांकडून संबंधित यंत्रणेकडे जमा करण्यात आली नाही. त्यानुषंगाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून लोकवाट्याची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.
शेती अवजारे व कृषिपयोगी इतर साहित्य वाटपात ज्या कर्मचाऱ्यांनी लोकवाट्याची रक्कम जमा केली नाही, अशा संबंधित कर्मचाऱ्यांकडून लोकवाट्याची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात संबंधित कर्मचाऱ्यांकडून लोकवाट्याची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
शंकर तोटावार
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग