शिक्षक समायोजनाची प्रक्रिया दोन दिवसांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:28 AM2017-09-21T01:28:23+5:302017-09-21T01:28:38+5:30
अकोला : जिल्हय़ातील ५२ शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या यादीला पुणे शिक्षण आयुक्तांनी मान्यता दिली असून, येत्या दोन दिवसांमध्ये अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. मंगळवारी उशिरा सायंकाळी शिक्षणाधिकार्यांनी ७१ अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित केली आहे. ही पाहण्यासाठी शिक्षक गर्दी करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ातील ५२ शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या यादीला पुणे शिक्षण आयुक्तांनी मान्यता दिली असून, येत्या दोन दिवसांमध्ये अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. मंगळवारी उशिरा सायंकाळी शिक्षणाधिकार्यांनी ७१ अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित केली आहे. ही पाहण्यासाठी शिक्षक गर्दी करीत आहेत.
२0१६ व १७ च्या संचमान्यतेनुसार महिनाभरापूर्वी माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हय़ातील शाळांकडून अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांच्या माहितीसह त्यांचे विषय, आरक्षण आदी माहिती मागविली होती. त्यानुसार शाळांनी माहिती दिली. अतिरिक्त शिक्षकांची माहिती प्राप्त झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडे काही शिक्षकांनी आक्षेप नोंदविले होते. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात सुनावणी घेऊन अतिरिक्त शिक्षकांबाबत योग्य निर्णय घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. शिक्षण विभागाने अंतिम अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार करून पुणे येथील शिक्षण आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविली होती.
शिक्षण आयुक्तांनी यादीस मान्यता देऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. त्यानुसार शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, दिनेश तरोळे यांनी ७१ अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित केली.
यासोबतच रिक्त जागा असलेल्या शाळांचीही यादी शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रकाशित करण्यात आली. येत्या दोन दिवसांत अतिरिक्त शिक्षकांनी, त्यांच्या पसंतीक्रमानुसार शाळा निवडल्यानंतर लगेच त्यांना पसंतीच्या शाळेतील रिक्त जागेवर रुजू होण्याबाबत आदेश देण्यात येईल. रिक्त पद असलेल्या शाळेचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता, शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेणे बंधनकारक राहणार आहे. अतिरिक्त शिक्षकांची यादी पाहण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षक गर्दी करीत आहेत.
शिक्षकांच्या हरकती ऐकून घेणार!
संकेतस्थळावर भरलेल्या अतिरिक्त शिक्षक व रिक्त पदांबाबत शिक्षकांनी हरकत असल्यास किंवा आक्षेप नोंदवायचा असल्यास त्यांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रे व पुराव्यासह लेखी हरकत सादर करावी.
या हरकती शिक्षकांनी लेखी स्वरूपात वरिष्ठ लिपिक आर.पी. खडसे यांच्याकडे सादर कराव्यात. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन हे ऑनलाइन पद्धतीने व समुपदेशनाद्वारे करण्यात येईल.
२0१६ व १७ च्या संचमान्यतेनुसार विविध शाळांमध्ये ९१ रिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. काही शिक्षकांच्या हरकती, आक्षेप असतील, तर तेही ऐकून घेण्यात येतील आणि त्यानंतर निर्णय देऊन त्यांचे समायोजन करण्यात येईल.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी.