एकच जयघोष, छत्रपती संभाजी महाराज की जय...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:47 PM2019-05-15T12:47:22+5:302019-05-15T12:48:02+5:30
अकोला: छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘छावा’ संघटनेने मंगळवारी सायंकाळी भव्य शोभायात्रा काढली.
अकोला: छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘छावा’ संघटनेने मंगळवारी सायंकाळी भव्य शोभायात्रा काढली. शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने शिवाजी पार्कचा परिसर व शोभायात्रा मार्ग दुमदुमून गेला होता.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छावा संघटनेतर्फे सायंकाळी ६ वाजता शिवाजी पार्क येथून शोभायात्रेला सुरुवात करण्यापूर्वी शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी पूजन केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील, डॉ. गजानन नारे, छावाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे, डॉ. दीपक मोरे, डॉ. अमोल रावणकार, डॉ. संजय सरोदे, सुरेश खुमकर गुरुजी, श्याम कुलट, प्रदीप खाडे, अरविंद कपले, डॉ. नितीन गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. शिवाजी पार्क येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेमध्ये आकर्षक देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. टाळ-मृदुंग, दिंडी, लेजीम पथकाच्या तालावर छावाचे कार्यकर्त्यांनी फेर धरला होता. शोभायात्रेमध्ये हवेत तरंगणारा साधू, पोटात तलवार खुपसलेला युवक, महादेवाची वेशभूषा आणि युवतींचे लेजीम पथक लक्ष वेधून घेत होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्रिशूलधारी व्यक्तीही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मिरवणुकीत छत्रपती राजे संभाजी यांच्या रथासोबतच विविध देखावे सहभागी झाले होते. वाजतगाजत, संभाजी महाराजांचा जयघोष करीत शोभायात्रा अकोट स्टॅन्ड चौकात पोहोचली. येथून मानेक टॉकीज, जुना कापड बाजार, कोतवाली मार्गे गांधी चौकात पोहोचली. दरम्यान, चौकाचौकात मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रेमध्ये मांजरीचे जय मल्हार वाघे मंडळ, महिला स्वयंरोजगार बचतगट माझोड, खोटेश्वर सांप्रदायिक भजन मंडळ एकलारा (बानोदा) सहभागी झाले होते. शोभायात्रेमध्ये श्याम कोल्हे, संतोष ढोरे, डॉ. अमर भुईभार, डॉ. कन्हैया अग्रवाल, डॉ. अनुप अग्रवाल, डॉ. प्रफुल वाघाडे, डॉ. स्वप्निल काकड, डॉ. स्वप्निल सरोदे, प्रकाश गवळी, अनिरुद्ध भाजीपाले, बाळासाहेब लाहोळे, बबलू पाटील वसू, मनोहर मांगटे पाटील, राजेश नकासकर, बाळू सोलापुरे, मनीष खांबलकर, राजेश मनतकार, प्रमोद रोडे, दुर्गासिंग ठाकूर, ब्रह्मा पांडे, निवृत्ती वानखडे, प्रवीण बाणेरकर, डॉ. संतोष भिसे, गोपाळ गालट, केशव बगाडे, विशाल तेजवाल, दिनकर फाटकर, प्रभुदास मेसरे आदी सहभागी झाले होते.
भिलीच्या आदिवासी नृत्याने वेधले लक्ष
शोभायात्रेमध्ये तेल्हारा तालुक्यातील भिली गावातील आदिवासी बांधव व महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले.
जिजाऊ लेजीम पथकाच्या मुलींचाही जल्लोष
शोभायात्रेमध्ये केसरी फेटे परिधान केलेल्या जिजाऊ लेजीम पथकाच्या मुली, युवतींनी लेजीम व डफड्याच्या तालावर फेर धरीत, लेजीमचे विविध प्रात्यक्षिक सादर करून लक्ष वेधले.
हवेत तरंगणारा साधू पाहण्यासाठी गर्दी
छावा संघटनेच्या शोभायात्रेमध्ये हवेत तरंगणारा साधूचा देखावा सादर करण्यात आला. या साधूची वेशभूषा पिंप्री जैनपूर येथील राजेंद्र दाभाडे यांनी केली. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यासोबतच पोटात तलवार खुपसून परिक्षित बोचे यांनी, अरविंद बाणेरकर यांनी गळ्यात चाकू खुपसून प्रात्यक्षिक सादर केले. महादेवाची भूमिका सिरसो येथील गुलाबराव मिरतकर यांनी केली.