कांदा प्रतवारी यंत्राची होणार निर्मिती; डॉ. पंदेकृविचा अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांसोबत सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:33 PM2018-07-27T13:33:20+5:302018-07-27T13:37:46+5:30
अकोला : कांदा उत्पादनात राज्य आघाडीवर असून, कांदा प्रतवारी करणे कठीण होत असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुधारित कांदा प्रतवारी यंत्र निर्मिती केली आहे.
अकोला : कांदा उत्पादनात राज्य आघाडीवर असून, कांदा प्रतवारी करणे कठीण होत असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुधारित कांदा प्रतवारी यंत्र निर्मिती केली आहे. या यंत्राची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांसोबत या कृषी विद्यापीठाने बुधवारी सामंजस्य करार केला.
कृषी विद्यापीठांतर्गत कापणी पश्चात अभियांत्रिकी संशोधन विभागाने विविध प्रक्रिया उपकरणे, यंत्र विकसित केली असून, नव्याने सुधारित मॉडेल निर्माण केले आहे. ही उपकरणे, यंत्र निर्मितीसाठी आतापर्यंत २५ खासगी यंत्र निर्मात्यासोबत कृषी विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. यातून १८ प्रकारची यंत्रे निर्माण होणार आहेत. असाच हा नवीन करार करण्यात आला असून, या कराराच्या माध्यमातून शेतकरी व विद्यार्थ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केली. कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, संगणक प्रणाली, स्वयंचलित कृषी प्रणालीचा उपयोग करू न शेतीमध्ये दुसरी हरितक्रांती होऊ शकते, असेही डॉ. भाले म्हणाले. यावेळी संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर, डॉ. धनराज उंदिरवाडे, डॉ. प्रमोद वाकळे, सीपना अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. रोडे, डॉ. व्ही.के. शांडिल्य, डॉ. ए. व्ही. गुल्हाने, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. जी. एस. गावंडे, विकास भांगडिया व विलास अनासने उपस्थित होते.