अकोला जिल्ह्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस कार्ड तयार होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 02:17 PM2018-08-19T14:17:16+5:302018-08-19T14:19:59+5:30
जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची २८ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शालेय स्तरावर पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणी सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची २८ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शालेय स्तरावर पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे. पायाभूत चाचणीमध्ये मिळणारे गुण शिक्षक अप्लिकेशनमध्ये आॅनलाइन किंवा आॅफलाइन भरणार आहेत. हे अप्लिकेशन सरल प्रणालीशी जोडलेले असल्याने ते गुण आपोआप सरल प्रणालीत जातील. त्यामुळे जिल्ह्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस कार्ड तयार करण्यात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या केआरएनुसार देशपातळीवर मूल्यमापनात महाराष्ट्राचा प्रथम तीन क्रमांकामध्ये समावेश करण्याचे टार्गेट दिले आहे. त्यानुसार यंदा अध्ययन निष्पत्तींवर आधारित पायाभूत चाचणी ही राज्य मंडळाशी संलग्न शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रगती किती झाली, विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये कमी पडतो आहे, हे तपासण्यात येईल. त्यासाठी जिल्हा स्तरावर सर्व प्रश्नपत्रिका गोपनीय राहतील. प्रश्नपत्रिकांचे तालुकास्तरावरून केंद्रांना वितरण २१ ते २३ आॅगस्टदरम्यान करण्यात येईल. इ. दुसरी ते आठवीचा २८ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते १ पर्यंत प्रथम भाषा, २९ आॅगस्टला गणित, इ. तिसरी ते आठवी ३0 आॅगस्टला इंग्रजी (तृतीय भाषा) आणि इ. सहावी ते आठवी विज्ञान विषयाची चाचणी घेण्यात येईल. शिक्षकांनी गुणांचे मूल्यांकन केल्यानंतर मूलभूत क्षमतेत ७५ टक्केपेक्षा कमी गुण व वर्ग पातळीवरील क्षमतेत ६० टक्केपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय याद्या बनविण्यात येणार आहेत. अशा अप्रगत मुलांकडे विशेष लक्ष दिले जाईल. प्रगत विद्यार्थी प्रगत होईपर्यंत दर महिन्याला त्याची चाचणी घेतली जाणार आहे. पायाभूत चाचणी मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे. लेखी व तोंडी चाचणी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण संकेतस्थळावर भरले जातील. त्यानंतरच प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रोगे्रस कार्ड तयार होईल.
गैरप्रकार टाळण्यासाठी समिती
पायाभूत चाचणीमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत गुणवाढ होऊ नये, यासाठी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती नेमली आहे. या समितीतील अधिकारी व सदस्य प्रत्येक शाळेला भेट देऊन पाहणी करीत आहेत.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी पायाभूत चाचणी घेण्यात येते. गतवर्षीसुद्धा ही चाचणी घेतली होती. त्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावत असल्याचे दिसून आले. यंदासुद्धा विद्यार्र्थ्याचे प्रोग्रेस कार्ड तयार करण्यासाठी ही चाचणी होत आहे.
- समाधान डुकरे, ज्येष्ठ अधिव्याख्याता,
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था