इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची संपादणूक चाचण्यांमध्ये प्रगती समाधानकारक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:48 PM2019-11-10T12:48:03+5:302019-11-10T12:48:40+5:30
दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे टक्केवारीवरून दिसून आले आहे.
- नितीन गव्हाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात संपादणूक चाचणी घेण्यात आली होती. या संपादणूक चाचणीमध्ये दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे टक्केवारीवरून दिसून आले आहे.
जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी शिक्षकांच्या शिकविण्यातील आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा पाया कच्चा राहू नये, एकही मुलगा अप्रगत राहू नये, यासाठी संपादणूक चाचण्या आयोजित करण्याची संकल्पना मांडली होती. या संपादणूक चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थी ज्या इयत्तेत शिकत आहे, त्या इयत्तेत क्षमतांचीही संपादणूक वेळच्यावेळी तपासून व मदत करून अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यांच्या संकल्पनेनुसार जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीतील मराठी व उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी ५ ते ९ आॅगस्ट आणि २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीत भाषा, इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र विषयावर संपादणूक चाचणी घेण्यात आली होती. या चाचण्यांचे निकाल जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेकडे आले असून, यात इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न करण्यात येणार आहे.
जि.प. सीईओ आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेनुसार संपादणूक पातळी चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांमध्ये इ. दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक असल्याचे दिसून आले. त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
-डॉ. समाधान डुकरे,
प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था.