अकोला जिल्ह्यात पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 07:31 PM2021-02-15T19:31:07+5:302021-02-15T19:53:20+5:30
Prohibition order in Akola District जिल्ह्यात रविवार २८ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
अकोला : कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यात रविवार २८ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज निर्गमित केले आहेत. तसेच राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकारान्वये दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात आले आहेत.
आदेशातील प्रमुख बाबी-
- अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदीचे आदेश पारीत करण्यात आले असून त्यानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे.
- सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामुहिक कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ ५० व्यक्तिंनाच परवानगी असेल. मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
- लग्नसमारंभाकरिता केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. लग्नसमारंभाकरिता रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी अनुज्ञेय असेल. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी.
- लग्न समारंभाच्या नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी.
- हॉटेल/ पानटपरी/ चहाची टपरी/ चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. या ठिकाणी नागरीकांची गर्दी होत असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासन यांनी नियंत्रण ठेवण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. त्याच प्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळुन आल्यास संबंधित व्यावसायिक/दुकानदार यांचेवर कारवाई करण्यात येईल.
- अकोला जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था/प्रार्थना स्थळे यांनी त्यांच्या धार्मिक संस्थानामध्ये/ कार्यक्रमामंध्ये गर्दी होणार नाही या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर बंधनकारक राहील
- अकोला जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही या बाबत स्थानिक प्रशासन (महानगरपालिका / नगरपरिषद/ नगर पंचायत /ग्राम पंचायत) यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठण करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना त्यांचे स्तरावरुन करुन गर्दीस प्रतिबंध करण्यात यावा.
- अकोला जिल्ह्यामधील इयत्ता ५वी ते ९वी पर्यंत असलेल्या सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दि.२८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
- या कालावधीत ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील व त्याला अधिक वाव देण्यात यावा.
- खाजगी आस्थापना / दुकाने या ठिकाणी मास्क /फेस कव्हर असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलमध्ये सुद्धा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. या बाबत दर्शनी भागात बॅनर / फलक लावणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही करावी.
११) हॉटेलमध्ये तसेच बाहेरील आवारात पार्किंगसाठी गर्दी होणार नाही या बाबत योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात यावे. रांगा व्यवस्थापित करण्यासाठी व सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट खुणा करण्यात याव्यात. तसेच दर्शनी भागात फलक लावण्यात यावा.
१२) अतिथी / ग्राहकांनी वापरलेले फेस कव्हर्स / मास्क/ हातमोजे यांची संबंधीतांनी योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी.
१३) यापूर्वी कोविड-१९ चा प्रादुर्भाव फैलाव होवू नये या करिता वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेशांचे उललंघन होणार नाही या बाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.
यासंदर्भात महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, महानगरपालिका व महानगरपालिका क्षेत्र वगळून नगर पालिका क्षेत्रात मुख्याधिकारी व इतर क्षेत्रामध्ये उपविभागीय दंडाधिकारी /तालुका दंडाधिकारी यांनी तपासणी करावी. त्याच प्रमाणे संबंधीत क्षेत्रातील पोलीस विभागाने वेळोवेळी आवश्यक तपासणी करुन नियमानुसार कार्यवाही करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांना यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.