जमावबंदीचे उल्लंघन, ३२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; हरिहरपेठेत भिंत बांधण्याला विरोध
By नितिन गव्हाळे | Published: May 18, 2023 06:28 PM2023-05-18T18:28:48+5:302023-05-18T18:28:59+5:30
जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसा जमावबंदी असताना आदेशाचे उल्लंघन करून महिलांनी मोर्चा काढला होता.
अकोला : जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसा जमावबंदी असताना आदेशाचे उल्लंघन करून महिलांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे दोन्ही गटांविरुद्ध जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. संवेदनशील भागाची पाहणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. यावेळी हरिहरपेठच्या बाजूला असलेल्या गल्लीमध्ये आवारभिंत बांधण्याची मागणी एका गटाने केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या ठिकाणी भिंत उभारण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार मंगळवारी महापालिकेच्या वतीने भिंत उभारण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास दोन्ही गटांतील महिलांचा मोठा जमाव या ठिकाणी गोळा झाला आणि त्यांनी भिंत उभारण्यास विरोध केला. एका गटाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी जमावबंदी आदेश लागू असताना २० ते २५ महिलांचा मोर्चा सोनटक्के प्लॉट, हमजा प्लाॅट, कल्याणवाडी येथून हरिहरपेठेकडे निघणाऱ्या गल्लीमध्ये आणि पोलिस स्टेशनकडे घेऊन गेले होते; तर दुसऱ्या गटातील मोहम्मद फारूख पहेलवान हे काही महिलांना घेऊन आले होते. या महिलांनी भिंत बांधण्यास विरोध दर्शवून रस्त्यावर बसून घोषणाबाजी केली आणि जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश असताना महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जमावबंदी आदेश लागू असतानासुद्धा या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही गटांतील महिला व पुरुषांविरुद्ध कलम १३५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.