अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन उड्डाण पुलाचे बांधकाम लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:40 PM2019-02-25T12:40:37+5:302019-02-25T12:40:59+5:30
अकोला : अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनच्या बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाचे बांधकाम पुन्हा लांबणीवर पडले असून, मार्चनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- संजय खांडेकर
अकोला : अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनच्या बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाचे बांधकाम पुन्हा लांबणीवर पडले असून, मार्चनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२०१५ मध्ये या उड्डाण पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन देशाचे केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या थाटात केले होते. दरम्यान, साडेतीन वर्षांनंतर या कामाच्या निविदेला मंजुरी मिळाली; मात्र आता डिझाइन तयार नसल्याने, वृक्षतोड न झाल्याने, मार्गावरील पोल न हटविल्या गेल्याने आणि भूमिगत पाणी पुरवठ्याची पाइपलाइन काढल्या न गेल्याने हे काम रखडल्याचे सांगितले जात आहे. यातील नेमके कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.
अशोक वाटिका चौकापासून अकोला रेल्वे स्टेशनपर्यंत साडेतीन किलोमीटर अंतरापर्यंत हा उड्डाण पूल विस्तारला जाणार आहे. अमरावती रोड आणि दुसरीकडे दक्षता नगर मार्गाकडे जाण्यासाठी या उड्डाण पुलास मार्ग राहतील. दोन फ्लाय ओव्हर, एक अंडर पास आणि सर्व्हिस रोडचा यामध्ये समावेश आहे. अकोला शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीवर पर्याय म्हणून उड्डाण पूल बांधण्याचा पर्याय समोर आला होता; मात्र २०१५ पासून रेंगाळत पडलेल्या या उड्डाण पुलाचे बांधकाम अजूनही प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. त्याची सुरुवात मार्चनंतर होण्याची शक्यता केवळ वर्तविली जात आहे.
डिझाइन तयार नाही!
हरियाणा राज्यातील हिस्सार येथील जान्डू कन्स्ट्रक्शन कंपनीला अकोल्यातील उड्डाण पूल बांधकामाचा कंत्राट दिला गेला आहे. १६३.९८ कोटींच्या खर्चातून उड्डाण पुलाचे बांधकाम होणार आहे. प्रत्यक्ष काम सुरू केल्यापासून किमान दोन वर्षे तरी या उड्डाण पुलाच्या बांधकामाला लागणार आहेत. डिझाइन तयार न झाल्याने काम थांबले आहे. मार्चनंतर या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
उड्डाण पुलाच्या बांधकामाच्या अनेक परवानग्या रखडलेल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाइपलाइन या मार्गात आहे. ती हटविण्याची परवानगी अद्याप आलेली नाही. सोबतच विद्युत पोल, वृक्षतोड आदी परवानग्या मिळाल्यानंतर कंत्राटदार प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे. लवकरात लवकर काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-विलास ब्राम्हणकर, प्रकल्प प्रमुख अभियंता, अमरावती.