अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांसह प्रमुख उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क
By Atul.jaiswal | Published: April 26, 2024 01:05 PM2024-04-26T13:05:20+5:302024-04-26T13:06:58+5:30
भाजपचे अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मतदान; काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील दुपारच्या सत्रात करणार मतदान
अतुल जयस्वाल, अकोला: सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी सकाळी मतदानास प्रारंभ झाला असून, सकाळी ११ वाजेपर्यंत १७.३७ टक्के मतदान झाले आहे. सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाचा उत्साह दिसून येत असून, मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. मतदारसंघातील प्रमुख उमेदवार असलेले भाजपचे अनुप धोत्रे व वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सकाळच्या पहिल्या सत्रातच कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील भेटीगाठीत व्यस्त असल्याने त्यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत मतदान केले नव्हते.
भेटीगाठींमधून मोकळे झाल्यानंतर दुपारच्या सत्रात ते मतदान करणार असल्याची माहिती मिळाली आहे. अनुप धोत्रे यांनी त्यांचे मुळ गाव पळसो बढे येथील मतदान केंद्रांवर जाऊन मतदन केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व आई यांनीही मतदान केले. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पत्नी प्रा.अंजली आंबेडकर यांच्यासह अकोल्यात मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या सत्रात मतदान केल्यानंतर हे दोन्ही नेते भेटी गाठी घेण्यात व्यस्त झाले.