जिल्हा परिषदेत रखडली शिक्षकांची पदोन्नती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:18 AM2021-02-07T04:18:06+5:302021-02-07T04:18:06+5:30
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व पदवीधर शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे पदोन्नती ...
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व पदवीधर शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे पदोन्नती मिळणार तरी केव्हा, याबाबत जिल्ह्यातील पात्र शिक्षकांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांमधून सेवा ज्येष्ठतेनुसार उच्चश्रेणी मुख्याध्यापक, तसेच पदवीधर शिक्षकांमधून सेवाज्येष्ठतेनुसार केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षणविस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नती दिली जाते. परंतू जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत पदोन्नतीसाठी पात्र जिल्ह्यातील शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे पदोन्नती मिळणार तरी केव्हा, याबाबत जिल्ह्यातील पात्र प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षकांकडून प्रतीक्षा केली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पात्र शिक्षकांच्या पदेान्नतीची प्रक्रिया जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निवडश्रेणी, वेतनश्रेणी लागू
करण्याची प्रक्रियाही प्रलंबित!
जिल्हा परिषद अंतर्गत सेवेत २४ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वेतनात निवडश्रेणी लागू करण्यात येते. मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांना निवडश्रेणी लागू करण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. तसेच २१० शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्याची प्रक्रियादेखील प्रलंबित आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील शिक्षकांची बिंदू नामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
वैशाली ठग
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद