प्रचारतोफा थंडावल्या; उद्या मतदान
By admin | Published: August 3, 2015 01:55 AM2015-08-03T01:55:21+5:302015-08-03T01:55:21+5:30
ग्रामपंचायत निवडणुका; मतदारांच्या गाठीभेटीवर भर.
अकोला: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी गेल्या आठवडाभरापासून गावागावांत धडाडणार्या निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी सायंकाळी ५.३0 वाजता थंडावल्या. जाहीर प्रचार संपुष्टात आल्याने, उमेदवार आणि सर्मथकांनी गुपचूप घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देणे सुरू केले असून, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात येत असलेल्या जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. या निवडणुकांसाठी मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचा निवडणूक प्रचार २४ जुलैपासून सुरू झाला होता. शहरानजीकच्या मोठय़ा ग्रामपंचायतींसह सर्वच संबंधित ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये आठडाभरापासून ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचाराला उधाण आले होते. गावपातळीवर पुढार्यांसह विविध राजकीय पक्षांचे सर्कल आणि गावपातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते, पॅनलचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि उमेदवार व सर्मथक ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचारकार्यात गुंतले होते. उमेदवारांच्या प्रचारासाठी ऑटो, जीप, कार इत्यादी वाहने गावागावांत धावत होती. तसेच ऑटोवर लाऊडस्पीकर आणि बॅनर लावून उमेदवारांचा प्रचार करण्यात आला. मतदान प्रक्रिया संपण्याच्या ४८ तास आधी म्हणजेच रविवार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३0 ग्रामपंचायत निवडणुकांच्या धडाडणार्या प्रचारतोफा थंडावल्या. गावागावांत उमेदवारांच्या प्रचारार्थ लावण्यात आलेले बॅनर, पोस्टर्स उतरविण्यात आले. जाहीर प्रचारासाठी ऑटोवर लावण्यात आलेले भोंगे काढण्यात आले. तसेच प्रचारासाठी धावणारी वाहनेही थांबविण्यात आली. निवडणुकीचा जाहीर प्रचार संपुष्टात आल्याने, उमेदवार आणि सर्मथकांनी गुपचूप गावातील वार्डांत घरोघरी फिरून, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर आता भर देणे सुरू केले आहे.