सुटीच्या दिवशीही मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:11 AM2020-12-28T04:11:00+5:302020-12-28T04:11:00+5:30
अकोला : शासकीय कार्यालयांना सलग तीन दिवस सुटी असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सुटीच्या दिवशीही मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू ठेवण्यात आले. ...
अकोला : शासकीय कार्यालयांना सलग तीन दिवस सुटी असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सुटीच्या दिवशीही मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली होती.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या महसूल व वनविभागाने गत ३० सप्टेंबरपासून मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्कात शहरी भागाकरिता ३ टक्के व ग्रामीण भागातील व्यवहारासाठी २ टक्के सवलत दिली आहे. मुद्रांक शुल्काच्या सवलतीची मुदत ३० डिसेंबरपर्यंत आहे. तसेच २५, २६ व २७ डिसेंबर असे सलग तीन दिवस सार्वजिनक सुटी असल्याने, मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्यासंदर्भात नोंदणी महानिरीक्षकांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शनिवारी सुटीच्या दिवशी जिल्ह्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे सुटीचा दिवस असूनही मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली होती. जिल्ह्यातील तालुकास्तरावर दुय्यम निबंधक कार्यालयातही मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते.
..........फोटो.....................